क्रीडाक्रांतीसाठी शाळा, विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची - विजय पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:02 IST2018-12-23T06:02:35+5:302018-12-23T06:02:55+5:30
गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या विविध क्रीडा उपक्रमांद्वारे भारताची ‘क्रीडा देश’ बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. आज विविध खेळांमध्ये होणारी भारताची प्रगती पाहून ‘खेळ म्हणजे क्रिकेट’ हे समीकरण आता मागे पडू लागले आहे.

क्रीडाक्रांतीसाठी शाळा, विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची - विजय पाटील
गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या विविध क्रीडा उपक्रमांद्वारे भारताची ‘क्रीडा देश’ बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. आज विविध खेळांमध्ये होणारी भारताची प्रगती पाहून ‘खेळ म्हणजे क्रिकेट’ हे समीकरण आता मागे पडू लागले आहे. तरी देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अजूनही भारताला अनेक गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता असून तळागाळातील गुणवत्ता शोधून काढण्यासह सोयी-सुविधा निर्माण करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. याच विषयावर ‘कॉफी टेबल’ अंतर्गत डॉ. डी.वाय. पाटील स्पोटर््स अॅकेडमीचे चेअरमन डॉ. विजय पाटील यांच्याशी चर्चा केली आहे ‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी रोहित नाईक यांनी.
आज क्रीडाक्षेत्रात खूप बदल झाले आहेत. याविषयी काय सांगाल?
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसार आपल्याला जगावं लागतं. आज आपल्यापुढे व्यावसायिकता आणि खेळाचे तत्त्व यामध्ये समतोल राखण्याचे आव्हान आहे. खेळ नक्कीच व्यावसायिक झालेला आणि यातून खेळाडूही स्वत:ची प्रगती करत आहेत. यासह आज एक ‘स्पोटर््स इंडस्ट्री’ निर्माण झाली असून याद्वारे अगणित रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळे आज जे काही बदल झाले आहेत, ते चांगले आहेत असे मी म्हणेन. हे सर्व साधताना कदाचित आपण काही गोष्टींपासून दूर गेलो असू; पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत आपल्याला मोजावीच लागते. त्यामुळेच हा एक सकारात्मक बदल आहे असेच वाटते.
खेळाडूंच्या दृष्टीने ग्लॅमरचा फायदा झाला आहे की तोटा?
प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीना काही त्रुटी नक्कीच असतात. खेळामध्ये ग्लॅमर आले आहे आणि ते नाकारता येणार नाही. पण समाजाचेच एक प्रतिबिंब असल्याचे मला वाटते. कारण जे समाजाला आवडतं तेच क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. त्यामुळेच आजच्या जगामध्ये कशा प्रकारे खेळ सुरू राहील हे पाहूनच त्याचे व्यवस्थापन करावे लागते. पण त्याचबरोबर हे करत असताना एक विशिष्ट समतोल राखणेही तेवढेच आवश्यक आहे.
भारताची ‘क्रीडा देश’ बनण्याच्या दिशेने योग्य वाटचाल सुरू असल्याचे वाटते का?
सर्वांत महत्त्वाचे आणि चांगली गोष्ट म्हणजे भारताला पहिल्यांदाच एक खेळाडू आणि तेही आॅलिम्पिक पदक विजेते क्रीडामंत्री म्हणून लाभले आहेत. त्यामुळेच क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांचा खेळाविषयीचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा असणार आहे. क्रीडा देशाविषयी म्हणायचे झाल्यास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी नुकतेच म्हटले होते की आपल्या देशाने ‘खेळ खेळणारा देश’ म्हणून ओळख बनवली पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. खेळाप्रति नागरिकांना, समाजाला तयार केले पाहिजे. तरुण असो किंवा वयस्कर, प्रत्येकाने कुठलातरी खेळ खेळलाच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जे काही देश आज प्रगत झाले आहेत, त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही तिन्ही क्षेत्रे कुठल्याही देशासाठी फार महत्त्वाची आहेत. एकूण क्रीडा देश बनण्याकडे आता आपली वाटचाल सुरू झाली आहे असे दिसते. शेवटी बदल घडत असतात आणि ते एका दिवसात घडत नाहीत हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
इतर देशांच्या तुलनेत तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण किती सजग आहोत?
खेळ जेव्हा व्यावसायिक होतो, तेव्हा तंत्रज्ञानासारख्या सर्व गोष्टी आपोआप येतात. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जगात आपण कुठेही कमी नाही. आपल्या क्रिकेटपटूंचे टेÑनिंग शेड्यूल हे एका वेस्टर्न टेÑनिंग शेड्यूलप्रमाणे आहे. इथे खेळाडूंना कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे क्रिकेटच्या बाबतीत आपण तंत्रज्ञानामध्ये पूर्ण अपडेट आहोत. इतर खेळांविषयी म्हणायचे झाल्यास त्यांच्यामध्येही आता व्यावसायिकता येणे सुरू झाले आहे आणि त्यामुळे इतर खेळही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नक्कीच सजग होतील.
क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
- जगातील सर्व प्रगत देशांमध्ये क्रीडा क्षेत्र शालेय-विद्यापीठ स्तरापासून खूप मजबूत असल्याचे दिसून येईल. भारतीय क्रीडा व्यवस्थापनामध्ये आपल्याला विविध संघटना पाहायला मिळतात. शिवाय सरकारचेही नियंत्रण असते. त्यानंतर स्वयंसेवी संस्था किंवा क्लब अशी संस्कृती पाहण्यास मिळते. पण आपल्याला खरंच क्रीडा क्रांती घडवायची असेल, तर सर्वच शाळांनी, कॉलेजेसनी आणि विद्यापीठांनी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. भारतात शेकडो विद्यापीठे आहेत आणि प्रत्येकाने क्रीडा क्षेत्राची जबाबदारी घेतली, तर देशाचा क्रीडा पाया किंवा तळागाळात क्रीडा व्यवस्था अत्यंत मजबूत बनेल. त्यामुळेच क्रीडा क्रांती घडविण्यामध्ये शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठांची खूप मोठी भूमिका राहील. अमेरिकेमध्ये खेळांना इतकं महत्त्व दिलं जातं, की प्रत्येक विद्यापीठाचे स्वत:चे स्टेडियम आहे. तिथे विविध खेळ खेळले जातात. अशा सुविधा आपल्याकडे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांचे अनेक आॅलिम्पिक किंवा जागतिक पदक विजेते हे विद्यापीठ क्रीडा व्यवस्थेमुळे पुढे आले आहेत. त्यामुळे तळागाळातील क्रीडा व्यवस्था मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे. देशातील ज्या भागात नवीन शहरे वसवली जात आहेत, तिथेही क्रीडा क्षेत्राला महत्त्व देऊन उभारणी झाली पाहिजे.
सरकारने सुरू केलेले काही क्रीडा उपक्रम कालांतराने बंद पडले. ते सातत्याने सुरू राहण्यासाठी काय करावे लागेल?
प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सरकारवर अवलंबून राहूू नये, हे माझे पहिले मत आहे. देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. त्यामुळेच क्रीडा उपक्रम शालेय-महाविद्यालयीन स्तरांवर सुरू करणेच अत्यंत योग्य राहील. कारण यामुळे हे उपक्रम अनेक वर्षे सुरू राहतील. सर्व गोष्टी आपल्याला सरकार किंवा संघटनांवर सोडून देऊन चालणार नाही. काही गोष्टींमध्ये आपल्याला स्वत:हून पुढाकार घ्यावा लागेल.
क्रिकेट खेळ म्हणून मोठा का झाला? या खेळाच्या यशाचे कारण काय?
आकडेवारीच्या दृष्टीने बघायला गेल्यास खूप अनपेक्षित माहिती समोर येते. उदाहणार्थ, आयपीएलमध्ये १५०-२०० खेळाडू असतात. रणजी ट्रॉफीचा विचार केला तर ३०-३५ संघांतून प्रत्येकी २० खेळाडूंचा विचार केला, तर व्यवसाय म्हणून क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या ही ६०० ते हजारच्या घरामध्ये आहे. अब्जावधी लोकसंख्येच्या देशासाठी ही संख्या खूपच लहान आहे. त्यामुळे खेळ म्हणून क्रिकेट मोठा आहे असे अजिबात नाही. एक मात्र नक्की क्रिकेटसोबत अनेक व्यवसाय जोडले गेल्याने आर्थिकदृष्ट्या हा खेळ खूप मोठा दिसतो. क्रिकेट मोठा झाला कारण हा एक आवडीनिवडीचाही भाग आहे. देशात ८० टक्क्यांहून अधिक लोकांना या खेळाची आवड आहे. ब्रिटिशांनी हा खेळ भारतात आणल्यापासून क्रिकेटची वेगळी संस्कृती रुजली आहे. शिवाय हा खेळ अनेकांसाठी भावनिकही आहे. एक क्रिकेटप्रेमी म्हणून क्रिकेट मोठा खेळ का झाला हे मी शब्दांत सांगू शकणार नाही. आज इतर खेळांचीही प्रगती होत आहे, त्यांनाही खूप मोठी प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे क्रिकेटला नाव ठेवणं हे मला पटत नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्यासाठी बीसीसीआय डी.वाय. पाटील स्टेडियमकडे मुद्दाम दुर्लक्ष करतेय का?
मुद्दाम दुर्लक्ष होतंय असं मी म्हणणार नाही. पण माझं एक ठाम मत आहे की, सामने अशा ठिकाणी खेळवायला हवेत जिथे त्या खेळाची किंवा सामन्याची लोकप्रियता अधिक आहे. मग त्याच्यात कोणतेही शहर असू शकेल. त्यामुळे जिथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, अशाच ठिकाणी सामना खेळविला गेला पाहिजे. त्याचवेळी स्टेडियम माझे असल्याने साहजिकच माझी इच्छा आहे की, या ठिकाणी सामना खेळवला गेला पाहिजे. पण सध्या ज्या प्रमाणात क्रिकेट सामने खेळविले जातात, ते पाहता येणाºया काळात नक्कीच आमच्या स्टेडियमवरही आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यास मिळतील.
मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्षपद मिळवल्यानंतर हा प्रश्न सुटेल?
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. खेळाची प्रचंड आवड असल्याने एमसीए व्यवस्थापनामध्ये प्रवेश करण्याचा मी प्रयत्न केला. या खेळामध्ये माझेही काही योगदान राहावे यासाठीच मी प्रयत्न केले. त्यामुळेच खेळाच्या प्रेमामुळे मी क्रिकेट व्यवस्थापनामध्ये प्रवेश करण्याचा एक प्रयत्न केला होता. शिवाय अजूनही मी पुन्हा एमसीए निवडणूक लढवण्याचा विचार केलेला नाही. अर्थात खेळाची आवड असून जर सर्वांचे सहकार्य लाभले तर नक्कीच यामध्ये योगदान देण्याचे प्रयत्न राहतील.
मुलांना खेळाकडे वळविण्यासाठी पालकांना काय सल्ला द्याल?
खेळाचे महत्त्व काय आहे हे नव्याने सांगणार आहे. खेळामुळे मुलाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील. त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होईल. शिवाय खेळामधूनच मुलांमध्ये नेतृत्वशैलीचा विकास होण्यास हातभार मिळतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांघिक भावना निर्माण होण्यामध्ये खेळांचे खूप मोठे योगदान असते. त्यामुळे एक चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पालकांनी मुलांना खेळण्यास प्रवृत्त करावे.