धनंजय नागरगोजे आत्महत्येप्रकरणी शाळा संस्थाचालकांनी केला असा दावा, सरकारवर खापर फोडत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:56 IST2025-03-17T12:56:42+5:302025-03-17T12:56:42+5:30

Beed Crime News: धनंजय नागरगोजे यांनी मुलीला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून लिहून त्यात संस्थाचालकांवर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणी धनंजय नागरगोजे ज्या शाळेत शिक्षक  म्हणून काम करत होते त्या शाळेच्या संस्थाचालकांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

School administrators made a claim in Dhananjay Nagargoje End Life case, slamming the government and saying... | धनंजय नागरगोजे आत्महत्येप्रकरणी शाळा संस्थाचालकांनी केला असा दावा, सरकारवर खापर फोडत म्हणाले...

धनंजय नागरगोजे आत्महत्येप्रकरणी शाळा संस्थाचालकांनी केला असा दावा, सरकारवर खापर फोडत म्हणाले...

सुमारे १८ वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्याने हताश होऊन धनंजय नागरगोजे या जीवन संपवल्याची धक्का घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये  घडली होती. जीवन संपवण्यापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी मुलीला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून लिहून त्यात संस्थाचालकांवर गंभीर आरोप केले होते. या घटनेबाबत समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणी धनंजय नागरगोजे ज्या शाळेत शिक्षक  म्हणून काम करत होते त्या शाळेच्या संस्थाचालकांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच या संस्थाचालकांनी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी उचललेल्या टोकाच्या पावलासाठी सरकार जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

धनंजय नागरगोजे यांनी टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवल्याच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना गजरा मुंडे निवासी आश्रमशाळेचे संस्थाचालक विजय मुंडे म्हणाले की, आमच्या गजरा मुंडे निवासी आश्रमशाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक धनंजय नागरगोजे यांनी केजमधील कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर आत्महत्या केली. या घटनेमागचं जे काही कारण आहे ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे या घटनेआधी त्यांनी दोन तीन पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्या पोस्टमधून त्यांनी संस्थेशी संबंधित असलेले आमचे वडील, भाऊ, मी यांच्या नावांचा उल्लेख केला होता.

ते पुढे म्हणाले की, मला तुम्हाला आवर्जुन सांगायचे आहे की, धनंजय नागरगोजे यांना संस्थेने २००६ साली सहशिक्षक म्हणून नियुक्ती आदेश देऊन नियुक्त केलं होतं. त्यानंतर २०१० मध्ये शासनाने त्यांना कायम करण्याचा अध्यादेश काढला तेव्हा त्यांच्यासह इतर शिक्षक आणि कर्मचारी यांनाही सेवेत कायम करण्यात आले होते. तसेच शासनानेही त्याला मान्यता दिली होती.

दरम्यान, शाहू, फुले आंबेडकर योजनेतील जिल्ह्यात सुमारे १५ शाळा आहेत, तर राज्यामध्ये २००च्या आसपास आश्रमशाळा आहेत. मात्र या शाळांना मागच्या पंधरा वर्षांपासून शासनाकडून एक रुपयाही अनुदान मिळालेलं नाही. आता संस्थेने या शाळा कशापद्धतीने चालवल्या हे आम्हाला माहिती आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची, निवासाची व्यवस्था संस्थेने केली. शासनाने २०१९ मध्ये निर्णय घेत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देऊ केलं होतं. मागच्या दोन चार वर्षांपासून हे अनुदान मिळेल असं वाटत होतं. मात्र सरकारकडून हे अनुदान मिळालं नाही. तसेच हे अनुदान न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे. त्याचं कारण म्हणजे अनुदान न मिळाल्याने मागच्या १५-१६ वर्षांपासून काम करत असलेले शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे शासनाच्या या धोरणामुळे फार उदासीन झाले आहेत. त्याचं कारण म्हणजे इतके दिवस काम करूनही त्यांना अनुदान मिळालेलं नाही, तसेच अनुदान न मिळाल्याने त्यांची काम करण्याची इच्छा राहिलेली नाही, असा दावा त्यांनी केला. 

विजय मुंडे पुढे म्हणाले की, आता आम्हाला एवढंच सांगायचं आहे की, जर सरकारने शाळेला, संस्थेला अनुदान दिलं असतं आणि शाळेने किंवा संस्थेने ते अनुदान थांबवलं असतं, तर त्या ठिकाणी संस्था दोषी ठरली असती. पण तसा प्रकार झालेला नाही, कारण शासनाकडून अनुदान आलेलं नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकाला ते अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळेच हा प्रकार घडला. खरंतर असा प्रकार घडता कामा नये होता. आता सरकारकडे एवढीच मागणी आहे की, शाहू, फुले, आंबेडकर योजनेतील ज्या काही शाळा  आहेत, त्यांना सरकारने अनुदान द्यावं. जेणेकरून ही जी काही घटना घडली तशा घटना घडणार नाहीत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, धनंजय नागरगोजे यांनी जीवन संपवण्यापूर्वी एक भावूक पोस्ट लिहिली होती. त्यात ते म्हणाले होते की, "श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही" अशा शब्दात धनंजय नागरगोजे यांनी आपली व्यथा  सोशल मीडियावर मांडली होती. तसेच विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ  आव्हाड हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवीत आहे, असेही या पोस्टमध्ये लिहिले होते. 

Web Title: School administrators made a claim in Dhananjay Nagargoje End Life case, slamming the government and saying...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.