राज्यात २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; राज्य सेवा परीक्षा होईल या तारखेपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:10 IST2025-12-06T19:09:46+5:302025-12-06T19:10:29+5:30
राज्यासाठी विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी

Schedule of examinations to be held in the state in 2026 announced; State services examination will be held till this date
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचेसुद्धा अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षासंबंधीची आवश्यक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. गत काही वर्षांपासून एमपीएसी परीक्षांचे नियोजन बारगळले होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी होती.
इतर महत्त्वाच्या मुख्य परीक्षा
- राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ : २९ मार्च २०२६ पासून सुरू ते २३ एप्रिल २०२६ पर्यंत होईल.
- महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५ : ०५ मे २०२६ पासून सुरू ते ०९ मे २०२६ पर्यंत होणार
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा व कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२५ : १६ मे २०२६ रोजी
- महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ -१६ मे २०२६ रोजी होणार आहे.
- या सर्व परीक्षांचे निकाल जुलै व ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे.
सन २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे आहे
- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : ही पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट २०२६ मध्ये अपेक्षित आहे.
- राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ : नागरी सेवा मुख्य परीक्षा ०३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान होईल. या मुख्य परीक्षेचा निकाल अंदाजे फेब्रुवारी २०२७ मध्ये अपेक्षित आहे.
- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : पूर्व परीक्षा १४ जून २०२६ रोजी, तर मुख्य परीक्षा ०५ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे.
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : पूर्व परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी, तर मुख्य परीक्षा १३ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे.