क्यूआर स्कॅन करा अन् रिफंडची तक्रार नोंदवा; ‘रेल वन’ ॲपवरील तक्रारींवर तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:40 IST2026-03-19T10:39:10+5:302026-03-19T10:40:10+5:30
प. रेल्वेचे ‘सरल परतावा सेवा अभियान’

क्यूआर स्कॅन करा अन् रिफंडची तक्रार नोंदवा; ‘रेल वन’ ॲपवरील तक्रारींवर तोडगा
मुंबई : रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘रेल वन’ ॲपवरून व्यवहार करताना अनेकदा प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा होतात; मात्र तिकीट मिळत नाही, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘सरल परतावा सेवा अभियान’ सुरू करत या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अभियानाद्वारे प्रवासी आणि संबंधित बँका यांच्यात थेट समन्वय साधून रिफंड प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यात येणार आहे. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे अनेक व्यवहार प्रलंबित राहात होते. परिणामी, प्रवाशांना वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. विशेष म्हणजे, हा पाठपुरावा नेमका कुठे आणि कसा करावा, याबाबतही अनेक प्रवासी संभ्रमात होते. दररोज सरासरी १५ हून अधिक तक्रारी रेल्वेकडे येत असल्याची माहिती आहे.
रिफंडसंदर्भातील अडचणी असल्यास ‘रेल वन’ ॲप किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदवताना आवश्यक, अचूक माहिती भरणे, बँक स्टेटमेंट आणि ई-मेल नियमित तपासणे आवश्यक असल्याचे असल्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
असे होणार अडथळे दूर
सरल उपक्रमांतर्गत प्रवाशांना एक क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिकीट खिडकी, रेल्वेचा समाज माध्यमांवर हा कोड उपलब्ध होणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना थेट तक्रार नोंदवता येईल, तसेच तक्रारीची सद्यस्थितीही पाहता येणार आहे.
तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांची छाननी करून बँका आणि पेमेंट गेट वे यांच्याशी समन्वय साधत अडथळे दूर केले जाणार आहेत. याशिवाय, तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे, यासाठी विशेष मदत केंद्रही सुरू करण्यात आले आहे.