प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:46 IST2025-06-06T07:45:46+5:302025-06-06T07:46:21+5:30
मंत्रालयात प्रथमच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला. मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिकमुक्त झाला पाहिजे, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. मंत्रालयात प्रथमच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
‘कागदविरहित कामकाज करा’
मुंडे पुढे म्हणाल्या की, शासकीय व खासगी कार्यालयांत सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो, म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम मंत्रालयातील कामकाज कागदविरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे. पेपर व प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. ‘प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो’ अशी शपथ आजपासून घेण्याचे आवाहनही मुंडे यांनी केले.
‘प्लास्टिक मुक्तीचा संदेश राज्यात नेऊ’
मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, मंत्रालयात राबविलेला पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम फक्त उपक्रम नसून, हा एक जनसंदेश आहे. कागद व प्लास्टिकच्या वापरास आळा घालून आपण या उपक्रमाची सुरुवात करूया. मंत्रालयात साडेनऊ हजार कर्मचारी असून, या सर्वांनी एकल वापर प्लास्टिकमुक्तीचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात न्यावा. ‘माझे कार्यालय, माझे घर प्लास्टिकमुक्त, पर्यावरणस्नेही’ ही फक्त घोषणा नसून त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलूया. ‘प्लास्टिकमुक्त मंत्रालय’ हा संकल्प मनात ठेवून सर्वांनी कागदाचा वापर टाळू व कागदविरहित प्रणाली वापरात आणू, असेही त्यांनी सांगितले.