सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:40 IST2025-11-18T11:35:33+5:302025-11-18T11:40:51+5:30
Shraddha Raje Bhosle: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भाजपाने यावेळी नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोडक्यामोडक्या मराठीमुळे त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत.

सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली. राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने या निवडणुकीत आपलं वर्चस्व राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी प्रस्थापित तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भाजपाने यावेळी नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोडक्यामोडक्या मराठीमुळे त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेत यावेळी नगराध्यक्षपद महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. येथील नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या नीता सावंत कविटकर आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांचं प्रमुख आव्हान आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अडखळल्याने आणि मराठीत व्यवस्थित बोलता न आल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्रद्धाराजे भोसले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ‘’मी श्रद्धा भोसले, श्री देव पाटेकर आणि उपरलकर देवतांचा आशीर्वाद घेऊन मी सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पदासाठी भाजपामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्या आशीर्वादाने आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंतवाडीतील जनता आम्हाला पाठिंबा आणि आशीर्वाद देतील, अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला सावंतवाडीला सुंदरवाडी बनवायचं आहे. आम्हाला एकदा संधी मिळाली तर आम्ही ते करून दाखवू, असे श्रद्धा राजे भोसले यांनी यावेळी सांगितले. मात्र अस्खलित मराठीत बोलता येत नसल्याने त्या वारंवार अडखळत होत्या.
दरम्यान, श्रद्धाराजे भोसले ह्या स्वातंत्रपूर्व काळात सावंतवाडीत सत्ता असलेल्या सावंत-भोसले राजघरणाऱ्यातील सदस्या आहेत. सावंतवाडीचे अखेरचे राजे आणि माजी आमदार शिवरामराजे भोसले यांच्या त्या नातसून असून, लखमराजे भोसले यांच्या त्या पत्नी आहेत. श्रद्धाराजे भोसले या सावंतवाडीतील राजवाड्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. तसेच त्या सावंतवाडीची ओळख असलेल्या लाकडी खेळणी तसेच परंपरागत गांजिफा या खेळाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. श्रद्धाराजे भोसले यांचे पती लखमराजे भोसले हे गेल्या काही वर्षांपासून भाजपामध्ये सक्रिय असून, ते सध्या भाजपाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.