सातारा पोलिस ‘सीईआयआर’ पोर्टलमुळे राज्यात अव्वल, नेमकं काय आहे पोर्टल, फायदा काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:11 IST2025-08-28T13:10:50+5:302025-08-28T13:11:10+5:30

नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे पाऊल

Satara Police tops the state due to CEIR portal | सातारा पोलिस ‘सीईआयआर’ पोर्टलमुळे राज्यात अव्वल, नेमकं काय आहे पोर्टल, फायदा काय.. जाणून घ्या

सातारा पोलिस ‘सीईआयआर’ पोर्टलमुळे राज्यात अव्वल, नेमकं काय आहे पोर्टल, फायदा काय.. जाणून घ्या

सातारा : सातारा जिल्हा पोलिसांनी एक आदर्श उदाहरण निर्माण करत तब्बल २२०० हरवलेले मोबाइल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. ‘सीईआयआर’ पोर्टलचा वापर करून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. त्यामुळे सातारा पोलिसांची कार्यक्षमता (मुंबई प्रदेश वगळता) राज्यात ‘अव्वल’ ठरली आहे.

मोबाइल हरवला की सामान्य माणसाची मोठी गैरसोय होते. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर त्यात असलेली वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. अशा परिस्थितीत पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे ठरले आहे. मोबाइल हरवल्यानंतर आपला मोबाइल पुन्हा पोलिस परत करतील, असे अनेक नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते; परंतु सातारा पोलिसांनी रात्रंदिवस पोर्टलद्वारे मोबाइल शोधून अनेक नागरिकांना सुखद धक्का दिला.

काय आहे सीईआयआर पोर्टल..

मोबाइल हरवल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेले हे सीईआयआर पोर्टल आहे. आयएमईआय नंबरद्वारे मोबाइल ट्रॅक करून वापर बंद करता येतो. हरवलेला मोबाइल सापडल्यास त्याचा वापर पुन्हा सुरू करता येतो.

सातारा पोलिसांची कामगिरी..

सातारा जिल्हा पोलिस दलाने २०२४-२५ मध्ये तब्बल २२०० मोबाइल शोधून काढले. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे.

या उपक्रमाचा फायदा..

नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतोय. चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद घडत असेल तर पोलिसांना नागरिकांकडून तातडीने माहिती दिली जाते.

डिजिटल सुरक्षेला चालना

सीईआयआर पोर्टल वापरून सर्वाधिक मोबाइल शोधून काढणारे सातारा पोलिस राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. सातारा पोलिसांचा हा उपक्रम केवळ मोबाइल परत मिळवण्यापुरता मर्यादित नसून तो सुरक्षित आणि जबाबदार समाजासाठीचा मोठा टप्पा आहे.

सातारा शहरची कामगिरी दमदार

सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शखाली सर्वात जास्त म्हणजे तब्बल ३०० मोबाइल पोलिसांनी शोधून काढले आहेत. परराज्यात गेलेले मोबाइल पोलिसांनी कुरिअरनेही मागवले आहेत.

भारत सरकार दूरसंचार विभागाचे पत्र

‘सीईआयआर’मध्ये सापडलेल्या मोबाइल हँडसेटच्या जप्तीमध्ये जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी, दूरसंचार विभागाने एक रँकिंग फ्रेमवर्क तयार केला आहे. त्या सीईआयआर रँकिंग फ्रेमवर्कच्या आधारे, सातारा पोलिस जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील (मुंबई प्रदेश वगळता) सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा आहे. गोवा येथे ३ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक झोनल सुरक्षा परिषदेत पोलिस विभागातील प्रमुख कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत. ज्यांनी मोबाइल रिकव्हरी ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Satara Police tops the state due to CEIR portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.