'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:41 IST2025-10-24T14:39:46+5:302025-10-24T14:41:02+5:30
Satara Phaltan Crime, Doctor rape, Suicide case news: महिला डॉक्टरची सख्खी बहीण देखील वैद्यकीय अधिकारी आहे. तिला तिने फोनवरून आपल्यावर पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव येत असतात याची कल्पना दिली होती, असा खुलासा डॉक्टरच्या आतेभावाने केला आहे.

'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
फटलणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर आता सातारा पोलीस चांगलेच अडचणीत आले असून या प्रकरणाचे धागेदोरे आता बड्या राजकीय लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्याचे समोर येत आहे. महिला डॉक्टरच्या आतेभावाने खळबळजनक खुलासा केला असून दोन महिन्यांपूर्वी दोन पीएंच्या फोनवरून खासदार बोलले असल्याची तक्रार या डॉक्टरने पोलिसांकडे केली होती, तसे पत्र दिले होते असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
या महिला डॉक्टरची सख्खी बहीण देखील वैद्यकीय अधिकारी आहे. तिला तिने फोनवरून आपल्यावर पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव येत असतात याची कल्पना दिली होती. परंतू, अन्य गोष्टी तिने भीतीमुळे आपल्या बहिणीला सांगितल्या नसाव्यात असा दावा आतेभावाने केला आहे.
खासदार दोन पीएंच्या फोनवरून आपल्याशी बोलले आहेत, अशी लेखी तक्रार या महिला डॉक्टरने पोलिसांकडे केली होती. तसेच कारवाईची मागणी देखील केली होती. परंतू, या डॉक्टरने केवळ खासदार असा उल्लेख केल्याने हे खासदार नेमके कोण याचाही छडा आता पोलिसांना लावावा लागणार आहे. या डॉक्टरने आधी तक्रार केलेली होती, त्यावर का कारवाई झाली नाही, असा सवाल आता महिला आयोगाने केला आहे. एकंदरीतच महिला डॉक्टरच्या आत्महत्येची पाळेमुळे पोलिसांपासून ते राजकारण्यांपर्यंत गेलेली असल्याचे समोर येत आहे.