आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:32 IST2025-02-01T17:31:02+5:302025-02-01T17:32:20+5:30
२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला.

आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन
छत्रपती संभाजीनगर - सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून २ लाख रुपये कार्यालयाबाहेर उडवून प्रसिद्धी झोतात आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश सांबळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर पुष्पा स्टाईल डोक्यावर कळशी घेत साडी घालून साबळे यांनी आंदोलन केले आहे. गावातील महिलांच्या पाणी प्रश्नांसाठी मंगेश साबळे यांनी हे अनोखे आंदोलन केले. सध्या या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावातील पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन केले. गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. मागील ४ वर्षापासून गावात जल जीवन मिशनचं काम अपूर्ण आहे. या कामाकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या कार्यालयाबाहेर मंगेश सांबळे यांनी आंदोलन केले. २०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच योजनेला निधी मिळतो, पण काम प्रत्यक्षात होत नाही. अधिकारी काम करत नाहीत. ४ वर्ष झाली, महिलांना प्यायला पाणी मिळत नाही यात काही भ्रष्टाचार झालाय का असा सवाल करत सरकारने नव्या घोषणा करण्याऐवजी आधीच्या योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी सरपंच मंगेश साबळे यांनी केली. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२८ पर्यंत जल जीवन मिशनला मुदतवाढ देण्याची घोषणा केली. त्यात १५ कोटी कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळत असल्याचं सांगण्यात आले.
अनोख्या आंदोलनामुळे कायम चर्चेत
मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी कायम चर्चेत असतात. सरकारी कार्यालयासमोर पैसे उधळणे, मराठा आरक्षणासाठी स्वत:ची नवी कोरी कार जाळणे यासारखे प्रकार केल्याने साबळे चर्चेत असतात. मंगेश साबळे यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मंगेश साबळेंचा पराभव झाला असला तरी त्यांना १ लाख ५५ हजार मते पडली होती.