सारथीची शिष्यवृत्ती अचानक केली बंद, राज्यातील ७० हजार विद्यार्थी वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:12 IST2025-09-13T19:11:49+5:302025-09-13T19:12:18+5:30

मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा : जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

Sarathi's scholarship suddenly closed, 70 thousand students in the state are in a dilemma | सारथीची शिष्यवृत्ती अचानक केली बंद, राज्यातील ७० हजार विद्यार्थी वेठीस

सारथीची शिष्यवृत्ती अचानक केली बंद, राज्यातील ७० हजार विद्यार्थी वेठीस

कोल्हापूर : शासनाने अचानक सारथीच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असून, त्यामुळे ७० हजारांवर जास्त मराठा विद्यार्थी वंचित राहणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती राज्य शासनाने ताबडतोब सुरू करावी; अन्यथा मराठा महासंघ अन्यायग्रस्त विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शुक्रवारी मराठा महासंघाने दिला.

सारथी संस्थेमार्फत आठवीमध्ये एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांना मासिक ९०० रुपये शिष्यवृत्ती ४ वर्षांकरिता दिली जात होती. मराठा समाजातील वार्षिक अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत होता. शिष्यवृत्ती बंद झाल्याने मराठा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. आजघडीला शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना चाळीस कोटींपर्यंत शिष्यवृत्ती अदा करणे गरजेचे होते. 

परंतु, एकतर्फी निर्णयाने शासनाने काय साध्य केले, हा प्रश्न आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने कार्यरत सारथीला त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. संस्थेने शैक्षणिक उन्नतीसाठी काम करणे अपेक्षित असताना संचालक मंडळाने मध्येच शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, उदय देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, संयोगीता देसाई, दिगंबर हुजरे पाटील, संभाजी पाटील, संदीप चव्हाण, काका पोवार, पंढरीनाथ भोपळे, प्रसाद पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sarathi's scholarship suddenly closed, 70 thousand students in the state are in a dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.