संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या साडूकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:17 IST2025-03-12T18:14:26+5:302025-03-12T18:17:24+5:30
Santosh Deshmukh Murder Case: मागच्या काही दिवसांपासून बीडमधील गावगुंडांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडुकवाडी गावचे सरपंच दादा खिंडळकर यांनी केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या साडूकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक समोर येत असलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे मागच्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. त्यातच बीडमधील गावगुंडांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडुकवाडी गावचे सरपंच दादा खिंडळकर यांनी केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ बीडमधील बाभूळवाडी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे एका शेतामध्ये काही जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचं व्हिडीओ चित्रिकरणही करण्यात आलं. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांमध्ये बेडुकवाडचे सरपंचं दादा खिंडळकर यांचाही समावेश होता. तसेच हे दादा खिंडळकर हे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कायदा सर्वांसाठी समान असून, या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असं विधान धनंजय देशमुख यांनी केलं आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडळकर हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये धनंजय देशमुख यांच्यासोबत अनेकदा दिसून आले होते. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादा खिंडळकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून, ते म्हणाले की, मी ज्या धनंजय देशमुख कुटुंबासोबत आहे, त्या कुटुंबापासून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या ज्या व्यक्तींनी देशमुख कुटुंबाला मदत केली आहे. त्या त्या कुटुंबांना असे व्हिडीओ समोर आणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न आहेत. मात्र आरोपींना वाचवता येईल, असं मला वाटत नाही, असा दावाही दादा खिंडळकर यांनी केला आहे.