"माझे वडील मुलांसाठीतरी जगू द्या, अशी विनवणी करत होते,पण…’’, शोकाकुल वैभवी देशमुखचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:20 IST2025-03-06T22:19:43+5:302025-03-06T22:20:22+5:30
Vaibhavi Deshmukh on Santosh Deshmukh Murder: मला माझ्या मुलांसाठी तरी जगू द्या अशी विनवणी माझ्या वडिलांनी केल्यानंतरही आरोपींना काहीच वाटलं नाही. त्यावेळी त्यांना त्यांची मुलं आठवली नाहीत का? असा भावूक सवालही वैभवी देशमुख हिने यावेळी केला.

"माझे वडील मुलांसाठीतरी जगू द्या, अशी विनवणी करत होते,पण…’’, शोकाकुल वैभवी देशमुखचा सवाल
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करताना आरोपींनी त्यांचा केलेला अमानुष छळ आणि देहाच्या केलेल्या विटंबनेचे केलेले फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आपल्या भावाचे केलेले हाल पाहून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनाही आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आता संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनेही तिच्या वडिलांच्या करण्यात आलेल्या छळाबाबत मौन सोडलं आहे. आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत वैभवी देशमुख हिने तिच्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रौर्याची छायाचित्रे आरोपपत्रामधून समोर आली होती. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिच्याही भावना अनावर झाल्या. आरोपींनी आपल्या वडिलांसोबत केलेल्या क्रौर्याबाबत प्रसारमाध्यमांकडे भावना व्यक्त करताना वैभवी देशमुख म्हणाली की, माझ्या वडिलांच्या मृत्यूला आता तीन महिने होत आले तरी हे दु:ख कधीच न संपण्यासारखं आहे. ते असे व्यक्ती होते की कुटुंबीयांच्याच नाही तर गावकऱ्यांच्या मनातूनही त्यांच्या आठवणी जात नाही आहेत. माझ्या वडिलांच्या हत्येची जी छायाचित्रे समोर आली आहेत, ती पाहून माझ्या कुटुंबाची लढण्याची ताकदच संपून जात आहे. माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही फार दु:ख व्यक्त करतही बसू शकत नाही. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे.
फोटो पाहिले, वैभवीचा संताप, आता आकांना पडकण्याची मागणी...#LokmatNews#MaharashtraNews#MarathiNews#santoshdeshmukhpic.twitter.com/JIXIMlJ0AF
— Lokmat (@lokmat) March 7, 2025
वैभवी देशमुख पुढे म्हणाली की, हे सर्व कोण घडवून आणतंय हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण या प्रकरणातील एक आरोप अजूनही फरार आहे. तसेच या फोटोंमध्ये दिसत असल्याप्रमाणे माझ्या वडिलांना एवढी अमानुषपणे मारहाण करतानाही आरोपी हसताहेत. मला माझ्या मुलांसाठी तरी जगू द्या अशी विनवणी माझ्या वडिलांनी केल्यानंतरही आरोपींना काहीच वाटलं नाही. त्यावेळी त्यांना त्यांची मुलं आठवली नाहीत का? असा भावूक सवालही वैभवी देशमुख हिने यावेळी केला.
"हात पाय तोडा, पण…’’, संतोष देशमुख यांनी हत्येपूर्वी नराधम आरोपींना करत होते अशी विनंती
ही घटना खंडणीमुळे घडली आहे. तसेच आरोपी माझ्या वडिलांना एवढ्या अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत, त्यामुळे या आरोपींच्या मागे कुणाचा हात आहे आणि ही खंडणी जातेय ती कुणासाठी जातेय. तसेच हे कृत्य करण्यासाठी या लोकांना कुणी पाठवलं होतं, हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे, असे वैभवी देशमुख पुढे म्हणाली.