"धनंजय मुंडे यांच्या एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, तर...!" नाना पटोले स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:02 IST2025-03-04T19:01:21+5:302025-03-04T19:02:11+5:30
"सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर..."

"धनंजय मुंडे यांच्या एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, तर...!" नाना पटोले स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात संतापाची लाट आहे. नुकतेच त्यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. हे फटो आणि व्हिडिओ कुणाचाही थरकाप उडवणारे आहेत. यावरून संतोष देशमुख यांची कीती क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे प्राथमिकदृष्ट्या लक्षात येते. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. यासंदर्भात त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. अखेर आज मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यातच, आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी, "फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. एवढेच नाही तर, धनंजय मुंडे यांच्या केवळ एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "काल स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे प्रसारमाध्यमांमध्ये आलेले फोटो पाहून मनाला अतिशय वेदना झाल्या. मारेकऱ्यांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली असून, त्यांच्या राक्षसी कृत्याने कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा. तब्बल 80 दिवस हत्येचे पुरावे सरकारकडे असतानाही, सरकारने काहीच कारवाई केली नाही. या संवेदनहीनतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे."
काल स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे प्रसारमाध्यमांमध्ये आलेले फोटो पाहून मनाला अतिशय वेदना झाल्या. मारेकऱ्यांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली असून, त्यांच्या राक्षसी कृत्याने कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2025
तब्बल 80 दिवस हत्येचे पुरावे सरकारकडे असतानाही, सरकारने काहीच…
पटोले यांनी पुढे म्हटले आहे, "संस्कृती आणि माणुसकी जोपासणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने काळिमा फासला आहे. आज राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर या हत्याकांडातील सर्व सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. धनंजय मुंडे यांच्या केवळ एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील."