संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:40 IST2025-01-07T06:39:40+5:302025-01-07T06:40:19+5:30

अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही

Santosh Deshmukh murder case Pressure from outside on Minister Dhananjay Munde, but no protection from within the party | संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच खंडणी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असतानाच सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तूर्तास अभय दिले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करीत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या खात्यात मागील काही दिवसांत मी जी पावले उचलली आहेत, त्याची माहिती देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटल्याचे मुंडे यांनी या पत्रकारांना सांगितले. मला अजित पवारांनी राजीनामा मागितला नाही,  असे ते म्हणाले.

या प्रकरणावरून दिवसभरात एकापाठोपाठ घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांना भेटले, तर दुसरीकडे मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बीड प्रकरण लावून धरणाऱ्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, तर छगन भुजबळ यांनी मुंडेंची पाठराखण करीत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

शरद पवारांचे फडणवीस यांना पत्र

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या  घटनेविरोधात  आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि  इतर सन्माननीय व्यक्तींच्या  जीवितास धोका निर्माण  होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन  त्यांना योग्य ते पोलिस संरक्षण राज्य सरकारमार्फत पुरविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घ्या, राज्यपालांकडे मागणी

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते. 
  • देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
  • देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.

Web Title: Santosh Deshmukh murder case Pressure from outside on Minister Dhananjay Munde, but no protection from within the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.