वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:12 IST2025-04-14T13:11:53+5:302025-04-14T13:12:29+5:30

तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले.

Santosh Deshmukh Murder Case: Offer to encounter Valmik Karad; Sensational claim by suspended police officer Ranjit Kasle | वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर कासले यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहेत. त्यात वाल्मीक कराडच्या एन्काऊंटच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

रणजीत कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले.

तसेच मी मोठेपणा सांगत नाही. परंतु फेक एन्काऊंटर करताना ४ लोकांची टीम असते, त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिवांची गुप्त बैठक होते. त्यात काय करायचे हे ठरते. मग त्यानंतर ५-६ विश्वासू लोकांची टीम बनते. ती संबंधित ठिकाणी जाते, म्हणजे अक्षय शिंदे याचे झाले तसे, तिथे १ अधिकारी, २-३ अंमलदार अशी आणखी एक टीम तयार केली जाते. त्यांना ५,१०, १५ कोटी मोठी रक्कम एकाच वेळी दिली जाते. त्यानंतर या घटनेची चौकशी आपलेच सरकार करेल, त्यातून तुम्हाला मुक्त करू अशी वचने दिली जातात अशाप्रकारे बोगस एन्काऊंटर घडवून आणले जातात हा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला.

दरम्यान, आरोपीच्या हातात बेड्या असतात. त्याशिवाय दोरखंडाने हात-पाय बांधलेले असतात. अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर किती बोगस होता असंही रणजीत कासले यांनी सांगितले. बीड पोलीस दलात रणजीत कासले कार्यरत होते. त्यांचे निलंबन झालं असून त्यानंतर ते अनेक व्हिडिओ सोशल मीडियात टाकत असतात. त्यातच वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती हा दावा केल्यानं बीड जिल्ह्यात प्रशासनात खळबळ उडाली आहे. फक्त वाल्मीक कराड नव्हे तर इतर आरोपींचा फेक एन्काऊंटर कसा केला जातो हेदेखील कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करत गंभीर दावा केला आहे.
 

Web Title: Santosh Deshmukh Murder Case: Offer to encounter Valmik Karad; Sensational claim by suspended police officer Ranjit Kasle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.