"कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले", दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:13 IST2025-02-24T09:12:31+5:302025-02-24T09:13:55+5:30

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती वाल्मीक कराडचा मित्र असलेल्या बालाजी तांदळेंची असल्याचे समोर आल्यानंतर तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

santosh deshmukh case controversy Beed police used the car of Valmik Karad's friend Balaji Tandale to search for the accused. | "कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले", दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

"कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले", दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता अंजली दमानियांनी एक नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती बालाजी तांदळेंची आहे. बालाजी तांदळे हे वाल्मीक कराडचे मित्र असून, अंजली दमानियांनी यावरून पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बालाजी तांदळे हे २ कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचे मित्र आहेत. त्याचबरोबर कारेगावचे सरपंच देखील आहेत. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी बालाजी तांदळेंची गाडी वापरल्याचे समोर आले असून, अंजली दमानियांनी पत्र शेअर केले आहे. 

अंजली दमानिया काय म्हणाल्या? 

"हे अतिशय गंभीर आहे. यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलीस चौकशीवर? तुमची गाडी घेऊन आरोपीला शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा. असा आदेश स्कॉर्पिओ नंबर MH44AD0727 चे मालक यांना बीड पोलिसांनी दिला. ह्या स्कॉर्पिओचे मालक कराडचे  मित्र बालाजी तांदळे", असे म्हणत अंजली दमानियांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

"तपास मुद्दाम भलत्याच दिशेला भरकटत नेण्यासाठी आणि कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले. हा राजकीय दबाव कुणी टाकला असेल हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? एसपी अविनाश बर्फाळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन, गोसावी, भागवत शेलार ह्या सगळ्यांना बरखास्त करा आणि ह्यांना बालाजी तांदळे सकट सहआरोपी करा", अशी मागणी करत अंजली दमानियांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना घेरले आहे.   

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेंना सहआरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनीही केली आहे. त्याने आरोपींचा जामीन घेतला नसता, तर हे घडलंच नसतं, असे देशमुख म्हणाले आहेत. 

पोलिसांना विचारा माझी गाडी का वापरली? -बालाजी तांदळे

दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना बालाजी तांदळे म्हणाले की, "आम्ही दोन वेळा कर्नाटक, मुंबईला सात-आठ वेळा गेलो. पुण्याला पाच वेळा गेलो. लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही ठाणे, नवी मुंबई, भिवंडी इथे गेलो होतो. माझी गाडी का वापरली, हे पोलीस प्रशासनाला विचारा. मी थोडीच त्याचं उत्तर देणार. तुम्ही मलाच का घेऊन चाललात असं मी त्यांना कसं म्हणू शकत होतो. त्यांनी सांगितलं सोबत जा, गेलो", असे तांदळे म्हणाले आहेत. 

Web Title: santosh deshmukh case controversy Beed police used the car of Valmik Karad's friend Balaji Tandale to search for the accused.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.