Maratha Reservation भुजबळ-जरांगे पाटलांना संजय राऊतांचा मोलाचा सल्ला; "शिवरायांच्या महाराष्ट्रात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:24 AM2023-11-27T11:24:24+5:302023-11-27T11:48:51+5:30
आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला.
मुंबई - Maratha Reservation आरक्षणासारखे विषय एकत्र बसून त्यातून निर्णय घेण्याची गरज आहे. मग छगन भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, अन्य प्रमुख नेते. तुम्ही भाषणे आणि एकमेकांना आव्हान कसली देताय? तुम्ही दिलेले आव्हान हे महाराष्ट्राच्या मूळावर येतंय.महाराष्ट्राच्या सामाजिक अखंडतेवर एकत्र येतंय. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसले पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे.अशाप्रकारे तुमचे नेतृत्व, तुम्हाला टाळ्या मिळतील, तुमच्या जयजयकाराच्या घोषणा होतील. पण बाळासाहेबांनी जो मंत्र दिला होता, सगळे मतभेद, जातीभेद गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा आणि ती एकजूट म्हणजे शिवसेना होती हे विसरलेले दिसतायेत असा मोलाचा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळांनी गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे त्यावर आता सरकारला बोलू द्या. आता यावर राजकीय पक्षाच्या भूमिका घेतायेत त्याला अर्थ नाही. यावर सरकारने बोलावे. महाराष्ट्रातील वातावरण इतके खराब झालंय की याच कारणासाठी महाराष्ट्र स्थापन केला होता का? १०६ हुताम्यांनी आजचा दिवस पाहण्यासाठी बलिदान दिले होते का? जातीय विष राज्यात कुणी कालवलं नव्हते. समाज एवढा दुभंगला नव्हता. १९४७ च्या वेळी भारत-पाक फाळणी झाली तेव्हा अशी भाषा वापरली जातेय. आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत या राज्यात बाळासाहेब ठाकरेंनंतर सर्वमान्य नेतृत्व राहिले नाही.बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना प्रिय होते. त्यांचे सगळे ऐकत होते. सगळ्यांना एकत्र बसवण्याची ताकद त्यांच्यात होती.आज दिल्ली असो वा महाराष्ट्र समाज एकसंघ ठेवणारे नेतृत्व राहिले नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आरक्षणावरून एकमेकांचे खून करू, तंगड्या, हातपाय हातात देऊ अशी भाषा दुर्दैवाने पाहावं लागतंय. अशा महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या दुंभगलेला पाहायला मिळतोय अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली.
आम्ही श्रद्धेने अयोध्येला जाऊ, राजकारणासाठी नाही
येत्या काही दिवसांत २२ जानेवारीचं राजकारण संपल्यावर आम्हीदेखील अयोध्येला जाऊ. श्रद्धेनं जाऊ, राजकारणासाठी जाणार नाही असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यावरून राऊतांनी हे विधान केले. राम मंदिराबाबत शिवसेनेचीच भूमिका होती. राम मंदिराच्या योगदानात आमचाही तितकाच वाटा आहे जितका आज हे लोक श्रेय घेत आहेत. जेव्हा तिथे कुणी छातीवर गोळी घ्यायला तयार नव्हता तेव्हा तिथे शिवसैनिक पोहचले होते. मंदिर निर्माणच्या कार्यात आमचे योगदान होते आणि यापुढेही राहील. आदित्य ठाकरे मथुरेत श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत. मुथरेत मंदिराचे लोकार्पण होणार असून त्यासाठी आदित्य ठाकरेंना तिथे आमंत्रित केले आहे. त्यामुळे आज ते तिथे गेले आहे असं संजय राऊत म्हणाले.
मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाही. ४८ जागा आणि उमेदवार ताकदीने लढतील आणि जिंकतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.