Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला संजय राऊतांची दांडी; नाराज असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 14:51 IST2019-12-30T14:50:09+5:302019-12-30T14:51:17+5:30
सरकारच्या स्थापनेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत मात्र अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला संजय राऊतांची दांडी; नाराज असल्याची चर्चा
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. या सरकारच्या स्थापनेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत मात्र अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. राऊत यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यादीमध्ये त्यांचे नावच नसल्याने राऊत बंधू उद्धव ठाकरेंवर नाराज झाल्याचे दिसत आहे. तर एका वृत्तवाहिनीनुसार सुनिल राऊत हे आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
संजय राऊत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर म्हणाले की, एक चांगले आणि अनुभवी असलेलं मंत्रिमंडळ असून चांगलं काम करून राज्याला दिशा देईल. सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याने आमच्या घरातील कोणीही नाराज नाही. सरकार स्थापन करण्यात आम्हाला महत्वाची भूमिका निभावता आली. त्यातचं आम्ही समाधानी आहोत.
मात्र संजय राऊत हे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. भावाला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर राऊत यांनी मी अशा मंत्रिमंडळांच्या शपथविधीला उपस्थित राहत नसतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.