Sanjay Raut slams railway minister piyush goyal on shramik special train rkp | "...मग यादी कसली मागताय? राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय, हे विसरू नका"

"...मग यादी कसली मागताय? राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय, हे विसरू नका"

ठळक मुद्देरात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये रंगलेले ट्विटर युद्ध चांगलेच पेटले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. यादी कसली मागताय? तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात, हे विसरू नका अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री  पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.

पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "१४ मे २०ला सुटलेल्या  नागपुर - उधमपूर ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले. कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका."

दरम्यान, "महाराष्ट्रातील १२५ ट्रेनटी यादी कुठे आहे? मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मला फक्त 46 गाड्यांची यादी मिळाली असून त्यापैकी 5 पश्चिम बंगाल किंवा ओडिसाकडे जाणाऱ्या आहेत. परंतु चक्रीवादळ अम्फानमुळे त्या तूर्तास धावू शकत नाहीत." असा दावा पीयूष गोयल यांनी २ वाजून ११ मिनिटांनी ट्विटरवर केला. तसेच, १२५ ट्रेनची तयारीत असूनही आम्ही आज केवळ ४१ गाड्या सोडत आहोत" असेही त्यांनी म्हटले. 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात येत आहेत. मात्र, मजुरांना पाठविण्यासाठी अद्यापही रेल्वेकडून दिवसाला ८० ट्रेनची आवश्यकता असताना केवळ ५० टक्के म्हणजे ४० ट्रेन पाठवल्या जातात असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे केला. यावरुन आता रेल्वेमंत्री विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष ट्विटरवरुन पाहायला मिळत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Raut slams railway minister piyush goyal on shramik special train rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.