“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:32 IST2025-10-23T13:29:49+5:302025-10-23T13:32:14+5:30
Sanjay Raut News: सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. मुंबई अदानींपासून वाचवायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
Sanjay Raut News: आम्हाला काँग्रेसचापंतप्रधान करायचा होता. परंतु ते होऊ शकले नाही. आम्ही काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठीच इंडिया आघाडीची निर्मिती केली होती. कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते. तेव्हा आम्ही असे म्हणालो नाही की, आम्हाला शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.
मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल, असे विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले होते. या विधानावर बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर टोलेबाजी केली. कोण काय बोलत आहे, त्यावर मी आता मत व्यक्त करणार नाही. काँग्रेस हा आमचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. काँग्रेसने तो निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदानींपासून वाचवायची आहे, असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे मुंबईत वातावरण
सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे. मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसने समजून घेतल पाहिजे. काँग्रेसची साथ सोडणार नाही, असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नाही. मुंबईतील प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहे, असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेस दिल्लीत व देशात सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे, त्यात आमचे मत फार मोठे आहे. आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे आणि तुम्ही मुंबईचा महापौर करण्याच्या गोष्टी करत बसला आहात. तुम्ही २७ महापालिकांच्या महापौरपदी काँग्रेसच्या नेत्याला बसवा. आमची काहीच हरकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मागील ३० वर्षांपासून मुंबईत मराठी महापौर आहे. याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. अनेकदा यामध्ये काँग्रेसचे सहकार्य लाभले आहे ही गोष्ट विसरता येणार नाही. त्यामुळे एखादा काँग्रेस नेता यावरून काही बोलत असेल तर त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. ते केवळ एक दिवसासाठी प्रसिद्धीसाठी केलेले वक्तव्य असू शकते. मला वाटते की, काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद नसतील, केवळ अंतर्गत वाद उफाळून आला असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.