“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:57 IST2025-09-26T14:56:27+5:302025-09-26T14:57:19+5:30
Sanjay Raut News: जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
Sanjay Raut News: शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचली नाही. दिवाळीच्या आधी जनतेला , शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जनतेबरोबर रस्त्यावर उतरू. जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर या विषायवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी ११ ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थिती ते शिबीर घेणे शक्य नाही. म्हणून सर्व जिल्ह्यातून शेतकरी एकत्र येणार होते, त्याचे रुपांतर मोर्चात व्हावे आणि आपल्या मागण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवावा असे ठरले, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्यापेक्षा असंवेदनशील आहे, प्रशासनावर कोणताही धाक नाही. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की ती मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतील अशी शेतकऱ्यांनी भूमिका आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा
उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. ते अनेक गावात गेले, घरात गेले, बांधाच्या पलीकडेही गेले. शेतकरी त्यांची वाट पहात होते, महिला, लहान मुले, वृद्ध, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय हे सगळे उद्धव ठाकरेंची वाट पहात होते. मराठवाड्याचे , शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंबे हवालदिल आहेत, आजही त्यांना निवारा नसल्यामुळे ते निर्वनासितासारखे राहत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदी यांना भेटावे. मराठवाड्यातील , महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते सांगावे. घरात पाणी शिरले आहे. शेतात नदीचा प्रवाह वळला, शेती, जमीन राहिलीच नाही. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना कृतज्ञतापूर्वक सांगितले की, आपण जी कर्जमाफी केली, त्याच्याआधारे आम्ही इथपर्यंत आलो आहोत, आता पुन्हा कर्जमाफी केली नाही तर जगणे कठीण होईल असे शेतकरी सांगतात, असे राऊत यांनी म्हटले आहे.