“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:21 IST2025-10-28T13:18:35+5:302025-10-28T13:21:52+5:30
Sanjay Raut News: महाराष्ट्रात भाजपाकडे पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut News: देशभरात अनेक ठिकाणी भाजपा कुबड्यांवर सत्तेत आली. कुबड्यांच्या मदतीवर त्यांनी पक्ष वाढवला, आज बिहारमध्ये कुबड्या नाहीयेत का? महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत. कुबड्या घ्यायच्या, वापरायच्या आणि फेकून द्यायच्या, ही भाजपची नीती राहिली आहे. महाराष्ट्रात भाजपाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे. अमित शाह स्पष्टच बोलले आहेत. स्वाभिमान असेल तर शिंदे आणि पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बाबरीनंतर आम्ही देशभरात लोकसभा लढवणार होतो. परंतु, अटल बिहारी वाजपेयी यांनी विनंती केली की, तुम्ही निवडणुका लढवल्या तर भाजपाचे नुकसान होईल. तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात उमेदवार मागे घेतले, असा दावा संजय राऊतांनी केला.
अमित शाह हे राजकारणात फार उशिरा आले आहेत
अमित शाह हे राजकारणात फार उशिरा आले आहेत. ते व्यापारी म्हणून आणि व्यापार म्हणून ते राजकारण करत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षात व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली. त्यांना समाजकारण याचे काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे या कुबड्या नको, त्या कुबड्या नको हे सुरू आहे. मुलाला क्रिकेटमध्ये टाकायचे. घराणेशाही तिथून सुरू आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्र, राज्यात आपली सत्ता आहे. त्याने आपण समाधानी असाल; पण, मी नाही. आता प्रचंड मेहनत करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सफाया करून ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रात आणावे. महाराष्ट्रातील भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालत नाही, असे विधान अमित शाह यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.