सुप्रिया सुळेंना सोडून ७ खासदारांना अजित पवार गटाची ‘ऑफर’; राऊत म्हणतात, "मंत्री होण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:05 IST2025-01-08T10:49:39+5:302025-01-08T11:05:13+5:30
अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळेंना सोडून ७ खासदारांना अजित पवार गटाची ‘ऑफर’; राऊत म्हणतात, "मंत्री होण्यासाठी..."
Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसने शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांशी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी दिलेल्या ऑफरवरुन सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. यावरुनच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळावं यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे ८ खासदार निवडून आले होते. तर विधानसभा निवडणुकीत ८६ जागांपैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाला यश मिळालं. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. डिसेंबरमध्ये सुप्रिया सुळे आणि ७ खासदारांना अजित पवार गटात येण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. सुनील तटकरे यांनी ही ऑफर दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिलं. मात्र, अजित पवार गटाकडून आलेली ही ऑफर शरद पवारांच्या खासदारांनी नाकारली. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटलं आहे.
"जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद प्रफुल पटेल यांना हवं आहे. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो खासदारांचा कोटा लागतो तो पूर्ण करा असं प्रफुल पटेल यांना सांगितलं आहे. त्यासाठी तुम्ही शरद पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडल्यानंतर तेव्हाच प्रफुल पटेल यांना मंत्रीपद मिळेल. त्याचा महाराष्ट्राला आणि देशाला काहीच उपयोग नाही. पण प्रफुल पटेल यांना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे म्हणून शरद पवार गटाचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ईव्हीएम च्या माध्यमातून तुम्ही विधानसभा जिंकलात ना. तरी तुमची फोडाफोडीची हौस भागत नाही," असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवारांच्या पक्षातील सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे असे प्रयत्न न करण्यास बजावल्याचेही म्हटलं जात आहे.