“बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:26 IST2025-01-14T14:24:26+5:302025-01-14T14:26:03+5:30
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे, असा पलटवार संजय राऊतांनी केला.

“बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: शिवसेना शिंदे गटाची एक बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? देवेंद्र फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. यावरून आता संजय राऊतांनी निशाणा साधला.
हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे
एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी यांच्याबरोबरचे काय संबंध होते ते यांनी समजून घेतले पाहिजे. आत्ता जे लोक फडफड करत आहेत पाळलेले पोपट त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकले करून महाराष्ट्राचे नुकसान केले आहे. हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना काढा हे बोलताना यांच्या जिभा झडत कशा नाहीत? हा माझा सवाल आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, पदांचा म्हणजे शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी जर निश्चित केला. तर तेवढ्या कालावधीमध्ये काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. हे बोलताना वेदना होतात, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.