ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:29 IST2025-07-11T14:29:07+5:302025-07-11T14:29:29+5:30

Sanjay Raut News: ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत भाजपाच्या गोटात चिंता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

sanjay raut reaction on are delhi bjp leaders trying to prevent raj thackeray and uddhav thackeray from forming an alliance | ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News: मागील आठवड्यात उद्धव ठाकरेराज ठाकरे यांचा वरळीत मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा झाला. त्यामध्ये उद्धव यांनी राजकीय युतीचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा केली. भाजपाने या संदर्भात काही खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केले असून, त्याच्या निष्कर्षाची माहिती अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिली. महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधला. यावेळी ठाकरे बंधूंची युती होऊ नये, यासाठी दिल्लीतील भाजपा नेते प्रयत्न करत आहेत का, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, ते प्रयत्न करतील. ते व्यूहरचना करतील, ते दबाव आणतील, अनेक गोष्टी ते करतील. हा त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण, लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत. वरळीत झाले, मीरा-भाईंदरला झाले, राज्यात ठिकठिकाणी या ठिणग्या पडत आहेत. या आता कोणालाही विझवता येणार नाही. ही भीती महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांना सतावत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

मराठी माणसाची एकजूट तोडण्यावर दिल्लीत खल

महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ती अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, यावर दोघांमध्ये खल झाला. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यावर अमित शहा यांनी त्यांना त्यावर तोडगा काय असे विचारले. त्यावर मला मुख्यमंत्री करणे हा त्याच्यावरचा इलाज आहे, असे एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल असे सांगितले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपण आपल्या गटासह भाजपामध्ये विलीन होण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे, असा मोठा दावा संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी विधाने केली. ठाकरे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली तर काय परिणाम होतील? राज ठाकरे यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत मेळाव्यात दिलेले नाहीत. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करण्याची शक्यता किती आहे? ठाकरे बंधूंना लक्ष्य केले तर मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे उभा राहील का? मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करण्याकरिता अन्य कोणकोणत्या पक्ष, नेत्यांना सोबत घेणे शक्य आहे, अशा विविध मुद्द्यांबाबत शाह व शिंदे यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: sanjay raut reaction on are delhi bjp leaders trying to prevent raj thackeray and uddhav thackeray from forming an alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.