Sanjay Raut is a misnomer and a jerk; Shiv Sena strongly attacked from Tarun Bharat | संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार 
संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार 

मुंबई - पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने शिवसेनेवर प्रहार केले आहेत. 

तसेच सत्ता नको, मला माझा शेतकरी महत्त्वाचा आहे, हे वाक्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कित्येकदा तरी ऐकले आहे. पण, आज सत्तेच्या सारीपाटावर या उक्तीवरची कृती हरवून जाणं खरंच दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे अशी टीका संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली आहे. 

तरुण भारत अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे 

 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालविली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे. 
 • या एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? 
 • भाजपा आज सरकार स्थापन करू शकत नाही, असे अजीबात नाही. सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल. पण, भाजपाने तसे अजून केलेले नाही. याला एक विशिष्ट अर्थ आहे. भाजपाला जनादेशाची पूर्ण जाण आहे. 
 • हे ‘बेताल’ रोखठोकपणे ठोकून देतात की, भाजपाला 105 जागा मिळाल्या, कारण शिवसेना सोबत होती. अन्यथा भाजपाला 70 जागा तेवढ्या मिळाल्या असत्या. उद्या भाजपाने असे म्हटले की, सेनेला 56 जागा मिळाल्या, कारण भाजपा सोबत होती, अन्यथा 20 सुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय? 
 • छातीठोकपणे बोलणे आणि रोखठोकपणे लिहिण्याचे समर्थन केले तरी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ याचे समर्थन करायचे तरी कसे? 
 • रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?
 • महाराष्ट्रात राजकीय पक्षांना जो काही जनादेश मिळाला, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. हा जनादेश भाजपा आणि शिवसेना यांना एकत्र बसून राज्यकारभार करता यावा, यासाठीचा आहे. खरं तर भाजपाला बाजूला ठेवून कोणताही पक्ष सरकार स्थापन करूच शकत नाही, हे स्पष्टच आहे. 
 • अपक्षांना सुद्धा कायद्यानं पक्षांतर करता येत नाही, तर मग निवडणूकपूर्व युतीतील पक्ष निवडणुकीनंतर वेगळे कसे होऊ शकतात? आणि मुख्यमंत्रिपदासाठीचा जो आटापिटा चाललाय, तो कधीतरी शिवसेनेनं भाजपाच्या जागा कमी असताना देऊ केला काय? 
 • आता थोडं मागे वळून पाहू या. 1990 मध्ये भाजपा 42, सेना 52, 1995 मध्ये भाजपा 65, सेना 72, 1999 मध्ये भाजपा 56, सेना 69, 2004 मध्ये भाजपा 54, सेना 62, 2009 मध्ये भाजपा 46, सेना 45 असे संख्याबळ होते. या 5 पैकी एका निवडणुकीत युतीची सत्ता आली. पण, सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचे असल्याने मुख्यमंत्रिपद सेनेकडेच होते. 
 • 4 निवडणुकांमध्ये विरोधी पक्षात बसण्याचा कौल युतीला मिळाला. त्यापैकी 3 वेळा विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. पहिल्यांदा 2009 मध्ये भाजपाचा एक सदस्य अधिक असल्याने विरोधी पक्षनेते पद भाजपाकडे आले. ज्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा संख्याबळ पाहिले, ते आज मुख्यमंत्रिपदाबाबत कसा दावा करू शकतात? 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पुढाकाराबद्दल प्रश्र्नचिन्ह उपस्थित करून माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.
 • शेतकर्‍यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठी सुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्र्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा. 
 • आता याच ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. ‘अति तेथे माती’, ‘अति शहाणा त्याचा ‘...’ रिकामा’, ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ अशा अनेक मराठी म्हणी या महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत. त्या यांना का आठवत नाही? की मराठी बाण्याचे निव्वळ सोंगच समजायचे? 
 • कुठल्याही भाजपाच्या नेत्याने या बेताल विदुषकाला उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. कारण, त्यातून मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. महाराष्ट्राचे हित तर कधीही साधले जाणार नाही. 
 • संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण, संजयच धृतराष्ट्र होणार असेल, तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रानं चिंतीत  होणं स्वाभाविक आहे. ‘बेताल’ जर खांद्यावरून उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात, ज्या फांदीवर बसलो आहोत, ती कापणार्‍याला लाकुडतोड्या नाही तर ‘शेखचिल्ली’ म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच. 
Web Title: Sanjay Raut is a misnomer and a jerk; Shiv Sena strongly attacked from Tarun Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.