महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं याचा प्रत्यय जनतेला गेल्या पाच ते सहा वर्षात सातत्याने येत आहे. सर्वप्रथम २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी युती करून महाविकास आघाडीचे सरकार आणले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष वेगळा केला. २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेत राष्ट्रवादी पक्ष वेगळा केला. तर काही दिवसांपूर्वीच तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आणि एकाच व्यासपीठावरून त्यांनी मराठीचा मुद्दा मांडला. राज्याच्या राजकारणात अशा विविध घटना घडत आहेत. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घडल्याचे भाजपचे मत आहे. याच दरम्यान भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत-राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
"उबाठाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना ज्याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यातून सूत्रांकडून विविध माहिती मिळत असते, तशीच माहिती आम्हालाही काही सूत्रांकडून मिळाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून मागच्या पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी राहुल गांधींची दोन तास भेट घेतली. आणि राहुल गांधींना विनंती केली की, तुम्ही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करा आणि दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. याचाच भाग म्हणून मुंबईत वरळी मध्ये झालेल्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी झाली नव्हती. तेव्हापासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार करत आहे. आम्हाला मिळालेल्या सूत्रांची माहिती शंभर टक्के खरी आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून संजय राऊत यांनी पराकोटीचे प्रयत्न केले आहेत," असा दावा राम कुलकर्णी यांनी केला.
संजय राऊतांचा आरोप काय?
"शिंदे गटाचे पक्षप्रमुख दिल्लीत आहेत. त्यामुळे गुरूपोर्णिमेसाठी ते दिल्लीला जाणारच होते. गुरु म्हणून अमित शाहांच्या चरणावर डोके ठेवले, चाफ्याची फुले वाहिली. फोटो काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे स्वत:च ऑफर ठेवली. महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ही एकजूट अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीयदृष्ट्या आपल्याला फार मोठी अडचण होईल अशी चर्चा शाह-शिंदे यांच्यात झाली," असा दावा संजय राऊत यांनी केला.