Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:30 IST2023-03-26T18:29:49+5:302023-03-26T18:30:49+5:30
'गद्दारांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये.'

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका
नाशिक: आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. सभेपूर्वी शिवसेना(उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदेंना खोचक टोला
यावेळी संजय राऊत म्हणाले की, 'त्यांनी आमचं शिवसेना नाव काढून घेतलं, तरीही ही सभा शिवसेना म्हणूनच होत आहे. आमचा नेता तोच आहे, आम्ही सगळेही इथेच आहोत. येणारी जनताही तीच आहे. मग आमच्याकडून हिरावलं काय? हे त्या लोकांना कळेल.' येत्या 5 एप्रिलला एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार आहेत. यावर राऊत म्हणाले, 'त्यांना आम्हीच अयोध्या दाखवली. आमचंच बोट धरुन ते अयोध्येला गेले होते.'
फडणवीसांवर टीका
उद्धव ठाकरेंच्या उर्दू भाषेबाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, 'आम्ही नरेंद्र मोदींनाही जनाब नरेंद्र मोदी म्हणतो. या देशात विविधता आहे आणि विविधतेमध्ये एकता आहे. या देशात अनेक जाती, धर्म आणि भाषा आहेत. संविधानाने मान्यता दिलेल्या अनेक भाषा या देशात आहेत. हे भारतीय संविधानाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विसरू नये. आपली मुलं परदेशी भाषादेखील शिकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये. बाळासाहेबांना काय उत्तर द्यायचं ते आमचं आम्ही बघू. गद्दारांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.