“राज्यात दंगली घडाव्या म्हणून फडणवीस, भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहेत”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:46 IST2023-08-06T15:44:21+5:302023-08-06T15:46:17+5:30
Sanjay Raut News: सरकारने कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“राज्यात दंगली घडाव्या म्हणून फडणवीस, भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहेत”: संजय राऊत
Sanjay Raut News: देशात मणिपूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. अलीकडेच संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. यानंतर आता महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मणिपूर, राजस्थान, हरियाणा आण दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहे. काही ठिकाणी झाल्या आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. या राज्यात दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सूज्ञ आहे. अशा कटकारस्थानाला बळी पडणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा
महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साई बाबा यांचं महाराष्ट्र घडवण्यात योगदान आहे. त्यांच्यावर असं विधान करणं विकृती आहे. एखादी व्यक्ती अशा पद्धतीने विधान करत असेल तर सरकारने त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
खासदारकी रद्द करताना अभ्यास केला होता का?
राहुल गांधींना संसदेतून बाहेर काढण्यात आले. सुरत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर २४ तासात खासदारकी रद्द करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालायने त्या निकालाला स्थगिती देऊन ७२ तास उलटले आहेत. तरीही त्यांना संसदेत घेतले जात नाही. लोकसभा अध्यक्ष म्हणतात, आम्ही अभ्यास करू. कसला अभ्यास करता? खासदारकी रद्द करताना अभ्यास केला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि तुम्ही म्हणता अभ्यास करू? खरे म्हणजे २४ तासांत लगेचच राहुल गांधींना संसदेत घ्यायला हवे होते, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या आजूबाजूला बसला आहात. ज्यांना तुरुंगात टाकायला निघाला होता, ते तुमच्या खिशात आहे. तुमच्या हृदयात आहे. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसला आहात.