Sanjay Raut News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये जाण्यासाठी रवाना होत असून, भारताची बाजू भक्कमपणे जागतिक मंचावर मांडली जाणार आहे. यावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जागतिक स्तरावर काही प्रमुख देश नक्कीच महत्वाचे आहेत. सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे. चीन, श्रीलंका, म्यानमार, तुर्कस्थानलाही शिष्टमंडळ पाठवयला पाहिजे. पाठवले का? अशी विचारणा करत, चीन, तुर्कस्थानलाही सांगायला हवे की, पाकिस्तानला मदत करून तुम्ही चूक करीत आहात. नेपाळ सारखे राष्ट्र आपल्या शेजारी आहे. जे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. तिथेही शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. तुम्ही त्या देशात जाऊन आधी पाकिस्तानचा मुखवटा फाडायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
शिष्टमंडळातील प्रतिनिधी निवडताना आम्हाला विचारले नाही
या सरकारने शिष्टमंडळावर ज्यांना पाठवायचे आहे, त्यांची निवड करताना त्या पक्षाच्या प्रमुखांशी सुरुवातीला चर्चा केली नाही. जर आमच्याकडे, आमच्या पक्षप्रमुखांकडे किंवा इतर पक्षाच्या प्रमुखांकडे त्यांनी ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांची नावे मागितीली असती तर त्यांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे नक्कीच सहकार्य केले असते. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या युसूफ पठाणचा भाजपाने परस्पर शिष्टमंडळात सहभाग करून घेतला. हे अत्यंत चुकीचे आहे. ममता बॅनर्जी यांनी किरण रिजिजू आणि त्यांच्या यंत्रणेला जाब विचारला तुम्ही कोण आमचा सदस्य ठरवणारे? ममता बॅनर्जी यांनी अधिक अनुभवी असलेले अभिषेक बॅनर्जी यांना त्या शिष्टमंडळात सामील केले. हे जवळ जवळ प्रत्येक पक्षात झाले, असे संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी २०० देशात फिरले पण काही उपयोग झाला नाही. प्रत्येक देशात एस. जयशंकर जाऊन आले, तरी उपयोग झाला नाही. याचा अर्थ सरकार पूर्णपणे अपयशी आहे. म्हणून तुम्हाला ही कसरत करावी लागत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा एका शिष्टमंडळातील सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावर बोलताना, मला त्यांच्याविषयी माहिती नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी कुणी बोलले असेल. सुरुवातीला आमच्याकडून कुणाचेही नाव नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.