Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:19 IST2025-11-21T14:17:36+5:302025-11-21T14:19:23+5:30
ताडोबाच्या जंगलातून सह्याद्री प्रकल्पात आणलेल्या वाघिणीला नियंत्रित पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. तिला चांदोली जंगलात सोडण्यात आले आहे.

Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
आनंदा सुतार लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती (जि. सांगली): ताडोबाच्या जंगलातून सह्याद्री प्रकल्पात आणलेल्या वाघिणीला नियंत्रित पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. तिला चांदोली जंगलात सोडण्यात आले आहे. वनविभाग तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील पहिला टप्पा यामुळे यशस्वी झाला आहे. ताडोबातून आणलेल्या तारा वाघिणीला १८ नोव्हेंबरपर्यंत चांदोली परिसरात नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
तोऱ्यात पाऊल ठेवले जंगलात
तारा ही नवी ओळख मिळालेल्या या वाघिणीला पिंजऱ्यातच शिकार देण्यात आली. त्यामुळे ती तेथेच रमली. १८ नोव्हेंबर रोजी नियंत्रित पिंजरा खुला करण्यात आला, तरी खाद्य मिळत असल्याने ती दोन दिवस बाहेर पडलीच नाही, आतच फिरत राहिली. सकाळी ८ वाजता तिने डौलदार पावले टाकत पिंजऱ्यातून जंगलात प्रवेश केला.
'तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखविली आहे. ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, असे स्पष्ट झाले आहे. व्याघ्र पुनर्स्थापन प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 'तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प'वाघीण नैसर्गिक परिस्थितीशी पूर्ण सुसंगत वर्तन करत आहे. तिच्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धनाला नवी गती मिळणार आहे.'- एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक