मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच " वंचित "चा उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 07:00 IST2019-08-04T07:00:00+5:302019-08-04T07:00:12+5:30

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समीर कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली असल्याची माहिती..

sangh swayam sevak canditate stand Against Chief Minister | मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच " वंचित "चा उमेदवार?

मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच " वंचित "चा उमेदवार?

पुणे : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यास सत्ताधारी भाजपा व शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील काही माजी आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक काही नाराज नेते इच्छुक असल्याचा दावा करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समीर कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली असल्याची माहिती आघाडीच्या पार्लमेंटरी बोडार्चे सदस्य अ‍ॅड. आण्णाराव पाटील यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेच्या २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील मुलाखती झाल्या आहेत. शनिवारी पुण्यासह साताऱ्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. रविवारीही मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यापार्श्वभुमीवर पाटील यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने, रेखा ठाकूर व प्रा. किसन चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
आतापर्यंत राज्यात ११०० हून अधिक जणांनी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या असल्याचे सांगून पाटील म्हणाले, मुलाखतींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आघाडीकडून निवडणुक लढण्यासाठी इतर सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते इच्छुक आहेत. काही माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्षांनी मुलाखती दिल्या आहेत. पण काहींनी आताच नावे जाहीर न करण्यास सांगितले आहे. नागपुर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या समिर कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर अकोला मतदार संघातुन माजी आमदार दशरथ भांडे, परळी मतदार संघातुन काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख, केजमधून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही उमेदवारी मागितली असल्याचे पाटील यांनी सांगितले. 
------------
बी टीम बाबत माफीनंतर वाटाघाटी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम असल्याचे म्हटले होते. याबाबत काँग्रेसने बहुजन आघाडीला मतदान केलेल्या ४१ लाख मतदारांची जाहीर माफी मागावी. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत विचार केला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आघाडीसाठी केवळ काँग्रेस पक्षाशी चर्चा होणार आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पत्र मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
----------

Web Title: sangh swayam sevak canditate stand Against Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.