समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी

By Admin | Updated: October 7, 2015 01:15 IST2015-10-07T01:15:14+5:302015-10-07T01:15:14+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अंतिम

Sameer's brain mapping decision on Friday | समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी

समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अंतिम निर्णय शुक्रवारी दिला जाईल, असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी मंगळवारी सांगितले.
गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारीच संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयात हजर करून ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती आहे किंवा नाही, अशी विचारणा केली जाईल. तो न्यायमूर्तींसमोर येऊन काय सांगतो, त्यावर पुढील दिशा ठरणार आहे.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी सांगली येथे छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली.
दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग चाचणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सादर केला होता. त्यावर तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी, या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे.
त्यामुळे समीरची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती, तर आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का, तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का, या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer's brain mapping decision on Friday