पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 22:18 IST2025-12-24T22:15:26+5:302025-12-24T22:18:32+5:30
Nanded Crime News: सक्षम ताटे हत्या प्रकरणाची स्थिती आजही जैसे थे असल्याने सक्षमची आई आणि आंचलने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकरणाने शहरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
नांदेड - आरोपींना पाठबळ देत सक्षम ताटेचा खून करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या इतवारा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सक्षमची आई संगीता ताटे व प्रेयसी आंचल मामीडवार यांनी केली होती. त्याची दखल घेतली जात नसल्याने कारवाई करा, अन्यथा २४ डिसेंबर रोजी आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. या प्रकरणाची स्थिती आजही जैसे थे असल्याने सक्षमची आई आणि आंचलने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकरणाने शहरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
आंतरजातीय प्रेम प्रकरणातून २७ नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि फरशीने डोकं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आंचलचे वडील आणि भावांनी इतर सहकाऱ्यांसोबत मिळून हा खून केला होता. त्यानंतर, आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केल्याने हे प्रकरण संबंध राज्यात चर्चिले गेले होते. या प्रकरणातील मारेकरी अटक असले, तरी घटनेच्या दिवशी इतवारा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी माही दासरवाड, धीरज कोमूलवाड यांनी आंचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो, त्याला मारून ये, मग पुढे काय ते बघू, असे पोलिसांनी म्हटल्याचा आरोप आंचलने केला होता.
दरम्यान, विविध संघटनांनी दबाब आणत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु आजपावेतो गुन्हा काही दाखल झाला नाही. १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन २४ तारखेपर्यंत कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज पोलिसांनी रोखलं, यापुढे कोणत्याही क्षणी आम्ही जीवनघात करून घेणार असल्याचे सक्षमची आई व आंचलने सांगितले.