सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:09 IST2026-01-01T07:08:32+5:302026-01-01T07:09:05+5:30
दाते १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला येत्या ३ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. दाते यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल, असे गृहविभागाने स्पष्ट केले.
दाते १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. केंद्रीय समितीने दोन आठवड्यांपूर्वी मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे दाते यांची कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे.
आतापर्यंतचा कार्यकाळ
दाते यांनी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दक्षतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पदही हाताळले आहे. शहराच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन झालेले दहशतवाद विरोधी कक्ष आणि सोशल मीडिया सेल हे दाते यांच्या कल्पनेतूनच सुरू झाले होते. न्यायालयीन
कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालू शकते ही कल्पनाही दाते यांनी प्रत्यक्षात आणली.