‘लालपरी’तून ग्रामीण जनताही प्रवास करते; त्यांच्या सुखकर प्रवासासाठी ST बैठकीत चर्चा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:41 IST2026-03-05T14:39:21+5:302026-03-05T14:41:45+5:30

ST Bus News: लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत मोठी चर्चा होऊन मंत्र्यांनी निर्णय जाहीर केला.

rural people also travel by st bus discuss issues in meeting for their comfortable journey | ‘लालपरी’तून ग्रामीण जनताही प्रवास करते; त्यांच्या सुखकर प्रवासासाठी ST बैठकीत चर्चा करा

‘लालपरी’तून ग्रामीण जनताही प्रवास करते; त्यांच्या सुखकर प्रवासासाठी ST बैठकीत चर्चा करा

ST Bus News: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी 'लालपरी' आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अलीकडेच करण्यात आली. परंतु, ग्रामीण भागातील जनता एसटीने प्रवास करते. त्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

चांद्यापासून बांदयापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. 

‘लालपरी’तून ग्रामीण जनताही प्रवास करते

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत मोठी चर्चा होऊन मंत्र्यांनी निर्णय जाहीर केला. २५१ आगारे, ६१० बसस्थानके आणि सुमारे १२ हजार बसेसचा जाहिरातीसाठी वापर करण्याचे ठरले. एसटी बसच्या आत आणि बाहेर जाहिराती करून महामंडळ पैसे कमावणार आहे. सध्या ५०-५५ हजार इतकी असलेली एसटीची प्रवासीसंख्या १ कोटीपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न होणार असल्याचेही जाहीर झाले. पण महसूल मिळवताना ग्रामीण भागातील जनता ज्या परिस्थितीत प्रवास करते त्यांना स्वच्छता गृह, कँटीनसह सुखकर बसप्रवास देण्याबाबतही चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी कुजबुज सुरू आहे.

दरम्यान, राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणे प्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल. नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. 

 

Web Title: rural people also travel by st bus discuss issues in meeting for their comfortable journey