रुपाली चाकणकरांची खुर्ची धोक्यात, पक्षातील नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी, निर्णय गुलदस्त्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 20:31 IST2026-03-23T20:29:42+5:302026-03-23T20:31:37+5:30
Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

रुपाली चाकणकरांची खुर्ची धोक्यात, पक्षातील नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी, निर्णय गुलदस्त्यात?
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन उभे गट पडले आहेत. एका गटाने चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या गटाने केवळ फोटोंच्या आधारावर कारवाई नको, अशी भूमिका घेतली आहे. या संपूर्ण वादात आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रूपाली चाकणकर यांच्या पदाबाबत खडाजंगी झाली. दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे जनतेत पक्षाची चुकीची प्रतिमा जात आहे, पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणेच हिताचे ठरेल, असे मत पक्षातील बहुतांश पदाधिकाऱ्यांचे आहे. दुसरीकडे, काही निवडक नेत्यांनी चाकणकर यांची पाठराखण केली आहे. खरात याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होत असताना केवळ महिला आहेत म्हणून चाकणकर यांनाच लक्ष्य केले जात असल्याचा दावा या गटाने केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. त्याच वेळी त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अद्याप सुनेत्रा पवार यांनी यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. पक्षातील अंतर्गत कलहामुळे हा निर्णय लांबणीवर पडल्याचे समजते.