खरात प्रकरणी वादात अडकलेल्या रुपाली चाकणकरांनी NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 23:25 IST2026-03-27T23:15:27+5:302026-03-27T23:25:11+5:30
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.

खरात प्रकरणी वादात अडकलेल्या रुपाली चाकणकरांनी NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
पुणे: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. याआधी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.
अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सध्या एसआयटीकडून त्याचा कसून तपास सुरु आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांना खरात प्रकरण भोवले आहे.
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहेत. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी आहे. मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे ही मागणी केली आहे. आज सकाळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,’’ असं रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.