RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
By यदू जोशी | Updated: August 18, 2025 10:04 IST2025-08-18T10:04:03+5:302025-08-18T10:04:46+5:30
विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास

RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राज्य माहिती आयोगाने अशांना चाप लावण्याची भूमिका घेत एका झटक्यात हजारो अर्ज फेटाळण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत असे १० हजारांवर अर्ज/अपील फेटाळण्यात आले आहेत.
ठराविक माणसे राज्य माहिती आयुक्तांकडे हजारो अपील करतात. काही जण तर असे आहेत की त्यांचे एकेकाचे चार-पाच हजार अपील असतात. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी या अर्जांची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील अन्य सर्वच माहिती आयुक्तांनी त्यांना प्रतिसाद देत विशिष्ट हेतूने अर्ज करणाऱ्यांना आळा घालण्याची भूमिका घेतली आहे. माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी रोखठोक भूमिका ही घ्यावीच लागेल; तसे केले नाही तर जनतेचा या कायद्यावरील विश्वास उडेल, असा विचार समोर ठेवून आयोगाने आता कार्यवाही सुरू केली आहे.
सरकारी माहितीबाबत सरकारची मक्तेदारी मोडायची आणि सर्वसामान्यांसाठी माहिती खुली करायची म्हणून कायदा आणला गेला. आता या माहितीबाबत काही विशिष्ट लोक मक्तेदार बनणार असतील तर तेही होता कामा नये, हा आमचा उद्देश आहे.
-राहुल पांडे, मुख्य माहिती आयुक्त.
अनिर्बंध दुरुपयोग
कायद्याचा माफक वापर करणे आवश्यक असूनही जाणीवपूर्वक अनिर्बंध, अवाजवी दुरुपयोग केला जात आहे. शासकीय कार्यालये/प्राधिकरणे यांचा बहुमूल्य वेळ, साधनसामग्री आणि शक्ती यामुळे अधिक प्रमाणात खर्ची पडून सर्वसामान्यांना ज्या सेवा देणे अभिप्रेत आहे त्या देता येत नाहीत.
शासकीय कामकाजावर
गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्याच्या कार्यपद्धतीमुळे गरजवंत अर्जदारांवर अन्याय होतो, असे गंभीर निरीक्षण अनेक अपील फेटाळताना नोंदविण्यात आले आहे.