“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 00:11 IST2025-12-02T00:11:14+5:302025-12-02T00:11:28+5:30
RSS Chief Mohan Bhagwat News: सध्या सगळ्या जगात भारताच्या पंतप्रधानांचे ऐकले जाते. भारत मोठा होईल, तेव्हा विश्वाचे कल्याण होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
RSS Chief Mohan Bhagwat News: सध्या सगळ्या जगात भारताच्या पंतप्रधानांचे ऐकले जाते. संपूर्ण समाज संघटित झाला पाहिजे. संपूर्ण समाज संघटित झाला की, राष्ट्र वैभव संपन्न होईल. भारत मोठा होईल, तेव्हा विश्वाचे कल्याण होईल. भारत मोठा झाला की, जगातील कलह मिटतात, हा इतिहास आहे. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी उभा राहणारा समाज निर्माण करायचा आहे. मात्र, शक्ती असल्याशिवाय लोक ऐकत नाहीत. आता भारताची शक्ती जिथे प्रकट व्हायला पाहिजे, तिथे प्रकट होते आहे. ही शक्ती म्हणजे कार्यशक्ती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आदित्य प्रतिष्ठान आयोजित ‘कृतज्ञता सोहळ्या’त मोहन भागवत बोलत होते. या कार्यक्रमात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर लिखित ‘भारतीय उपासना’ या ग्रंथाचे आणि जितेंद्र अभ्यंकरकृत ‘पंढरीश’ या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले की, एकेका स्वयंसेवकांनी आपले काम केले. आपलेपणाच्या धाग्यांनी संघ बांधला गेला आहे. काम करताना काही मिळेल याची अपेक्षा स्वयंसेवकांना नसते. सनातन धर्माचे उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचे उत्थान आहे. त्यासाठी संघाचे कार्यकर्ते काम करतात. संघाला समाजाचा आधार आहे. कठीण परिस्थितीतही जनतेने साथ दिली म्हणूनच इथपर्यंत पोहोचता आले. राम मंदिर उभे राहिले. आता अशाच प्रकारे सद्भावनेतून पूर्वीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
१०० वर्षे संघाला झाली, आता आत्मपरीक्षणाची वेळ आहे
आपल्या लोकांसाठी काम करणे हे आमचे कर्तव्य होते. कर्तव्य करत असताना शंभर वर्षे आपोआप पूर्ण होत असतात. आपण फक्त टिकणे गरजेचे असते. संघाचे काम हे देशाचे काम आहे. संघाला संपूर्ण समाजाचे संघटन हवे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून एकीकडे गौरव, कृतज्ञता व्यक्त करण्यात आहे. मात्र, दुसरीकडे संघासाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. संघाला शंभर वर्षे पूर्ण करायची नव्हती. त्यापूर्वीच आपले काम पूर्ण करायचे होते. मात्र, हे झाले नाही. त्याला अनेक कारणे आहेत, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकटा संघ हा देश मोठा करील, अशा वल्गना आम्ही करत नाही. देशातील सगळ्यांनीच एकत्र येऊन काम केल्याशिवाय देश मोठा होणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, चालू शकणारा समाज निर्माण करायचा आहे. त्यासाठी संपर्क, संस्कार आणि योजनेद्वारे कोणताही द्वेष, मत्सर नसलेल्या लोकसंग्रहाचे काम करणे, हेच आमचे शील आहे. संपूर्ण समाज वैभवशाली होईल, तेव्हाच राष्ट्र वैभवशाली होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.