Maratha Reservation : मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये; अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:46 IST2021-11-30T17:44:41+5:302021-11-30T17:46:00+5:30
Maratha Reservation : शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबीयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.

Maratha Reservation : मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये; अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची राज्यातील महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबीयांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.
सदर कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता.
त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रूपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रूपये या निधीतून दिले जातील.
शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबीयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.