भाजपाच्या पोस्टरवर रिपाइं (आ)चा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
By Admin | Updated: February 10, 2017 18:48 IST2017-02-10T18:48:47+5:302017-02-10T18:48:47+5:30
मनपा निवडणुकीमध्ये भाजपाने जारी केलेल्या प्रचाराच्या पोस्टर व पत्रकावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा फोटो व निळा झेंडा वापरल्यासंदर्भात

भाजपाच्या पोस्टरवर रिपाइं (आ)चा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 : मनपा निवडणुकीमध्ये भाजपाने जारी केलेल्या प्रचाराच्या पोस्टर व पत्रकावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा फोटो व निळा झेंडा वापरल्यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या शहर कार्यकारिणीने आक्षेप घेत जिल्हाधिकारी, मनपा निवडणूक निर्णय अधिका-यांसह निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देणयात आला आहे.
रिपाइं (आ) चे म्हणणे आहे की, त्यांच्या पक्षाने भाजपासोबत नागपुरात मनपा निवडणुकीमध्ये युती तोडली आहे. त्यामुळे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा फोटो भाजपने त्यांच्या प्रचार साहित्यात व पोस्टरवर वापरणे चुकीचे आहे. तसेच पक्षाचा निळा झेंडा वापरणे सुद्धा चुकीचेच आहे. परंतु भाजपातर्फे सर्रासपणे याचा वापर केला जात आहे, यावर आक्षेप घेत रिपाइं (आ)चे शहर अध्यक्ष राजन वाघमारे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली. तसेच मनपा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कुंभारे यांना सुद्धा निवेदन सादर केले. भाजपाने रामदास आठवले यांचे छायाचित्र व निळा झेंडा असलेले बॅनर, पोस्टर, हॅण्डबील आदी प्रचार साहित्य प्रकाशित केले आहे. ते मतदारांना वाटले जात आहे. त्यामुळे रिपाइं (आ)च्या उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम होत आहे. तेव्हा भाजपचे हे प्रचारसाहित्य जप्त करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात विकास गणवीर, शांतिलाल पखिड्डे,, भीमराव मेश्राम, राजेश ढेंगरे, हरीश जानोरकर, जयंत टेंभुरकर, विनोद थूल यांच्यासह रिपाइं (आ)चे उमेदवार साधना टेंभूरकर, हीरालाल हाडके, अवंतिका तांबे, मीनाक्षी बोरकर आदींचा समावेश होता.
घरडे यांचे वक्तव्य नैराश्येतून
रिपाइं (आ) ने भाजपासोबत युती तोडली आहे. ते पक्षाचे नेते रामदास आठवले आणि रिपाइंच्या झेंड्याचा वापर करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. इतकेच नव्हे तर यावर तातडीने कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचीही तयारी केली आहे, असे असतानाही रिपाइं (आ)चे पदाधिकारी बाळू घरडे यांनी पक्षाच्या भूमिकेवर शंका घेत बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांनी नैराश्येतून हे आरोप केले आले आहे. त्यांना काही शंका असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असे रिपाइंचे (आ)चे शहराध्यक्ष राजन वाघमारे यांनी स्पष्ट केले.