"...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल", अभिनेता किरण मानेंना रोहित पवारांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:23 PM2022-01-14T12:23:10+5:302022-01-14T12:26:40+5:30

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा निषेध करत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल, असे म्हटले आहे.

Rohit Pawar's support to actor Kiran Mane on dropped out serial star pravah | "...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल", अभिनेता किरण मानेंना रोहित पवारांचा पाठिंबा

"...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल", अभिनेता किरण मानेंना रोहित पवारांचा पाठिंबा

Next

मुंबई – विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र आता किरण माने यांनी या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे. दरम्यान, किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरवरुन किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा निषेध करत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल, असे म्हटले आहे.

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल. केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारे नाही", असे ट्विट करत रोहित पवार यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवरुन किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा निषेध करत भाजपावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

याचबरोबर, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनीही किरण मानेंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निळु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असा इशाराच जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला दिला आहे.

दरम्यान, अभिनेता किरण माने यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. परंतु किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांचे चाहते आक्रमक झाले आहेत. आय स्टँड विथ किरण माने या नावानं हॅशटॅग वापरत प्रेक्षकांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर किरण माने यांनीही फेसबुकवर पोस्ट करत “काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा... गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा” अशा शब्दात सूचक इशारा दिला आहे.

Web Title: Rohit Pawar's support to actor Kiran Mane on dropped out serial star pravah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app