'सरकारच्या कारस्थानाचा अंदाज आल्याने...'; 'लाडकी बहीण'वरुन रोहित पवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:35 IST2025-07-28T13:33:11+5:302025-07-28T13:35:05+5:30

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली

Rohit Pawar criticizes government after beneficiaries were disqualified in Ladki Bahin Yojana | 'सरकारच्या कारस्थानाचा अंदाज आल्याने...'; 'लाडकी बहीण'वरुन रोहित पवारांचा गंभीर आरोप

'सरकारच्या कारस्थानाचा अंदाज आल्याने...'; 'लाडकी बहीण'वरुन रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Ladki Bahin Yojana: राज्यातील १४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आलं आहे.  गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या योजनेवर १४ हजार पुरुषांनी डल्ला मारला. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची माहिती सादर केली. या अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ देणे बंद केल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लाभार्थींना अपात्र ठरवण्यावरुन मोठा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. त्यामध्ये २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असूनही लाभ घेत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सरकारने २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात आलं. अटी-शर्तीची चाळणी लावून लाडक्या बहिणींनाही फसवणारं हे सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं.

"कुठलीही पडताळणी न केरता केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या लाडकी बहिण योजनेचा राज्यात तब्बल १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. महिलांच्या योजनेचा पुरुषांनी लाभ घेणं चुकीचंच आहे, पण लाडक्या बहिणींच्या मतांनी या सरकारने आधी आपली सत्तेची पोळी शेकून घेतली आणि आता गरज संपताच याच बहिणींना योजनेतून वगळण्याचा सपाटा लावलाय," असा आरोप रोहित पवार यांनी केला.

"सरकारच्या या कारस्थानाचा अंदाज आल्याने ही बाब मी गेल्या दोन अधिवेशनांमध्ये मांडली होती, त्यावेळी कुणालाही वगळण्यात येणार नसल्याचं सरकारकडून सांगितलं खरं पण तरीही सुमारे २६ लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारने एका झटक्यात त्यांना सावत्र बहिणीची वागणून दिलीच. आधी १ रुपयांत पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना ‘टोपी’ घालणारं आणि आता अटी-शर्तीची चाळणी लावून लाडक्या बहिणींनाही फसवणारं हे सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी आहे," असंही रोहित पवार म्हणाले.

Web Title: Rohit Pawar criticizes government after beneficiaries were disqualified in Ladki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.