“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:17 IST2025-12-16T14:17:21+5:302025-12-16T14:17:21+5:30
Rohit Pawar News: आधी कुबड्या म्हणून हिणवले आणि आता भाजपाने अलगदपणे आपल्याच एका मित्रपक्षाला वेगळे पाडले, अशी टीका रोहित पवारांनी केली.

“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
Rohit Pawar News: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. यातच महायुतीतील भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यात समोरासमोर लढणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.
पुण्यात भाजपने ५ वर्ष चांगला विकास केला आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. मात्र पुण्याबाबत अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे समोरसमोर लढतील. पण ती लढत मैत्रीपूर्ण असेल. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल
अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील नेत्यांनीच भाजपबद्दल केलेली वक्तव्य बघितल्यानंतर आपला स्वार्थ साधला गेला की भाजप आपले खरे रंग दाखवायला सुरवात करते यावर त्यांच्याच मित्र पक्षांनी शिक्कामोर्तब केले. काल निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आम्ही पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये महायुती मध्ये लढणार नसल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला. आधी कुबड्या म्हणून हिणवले आणि आता भाजपने अलगदपणे आपल्याच एका मित्रपक्षाला वेगळे पाडले ही राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही तर काय आहे? असो! याच राक्षसी महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळे २०२९ मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही!, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार, असा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी हे विधान केले म्हणजे ते चर्चेनंतरच केले असेल. आम्ही अनेकदा एकत्र बसलो, चर्चा करतो त्यानंतर फडणवीसांनी ते विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक विधान केले असेल. २५ वर्ष मी महापालिका सांभाळली आहे. शहरांचा सर्वांगीण विकास कसा केला हे लोकांनी पाहिले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.