रस्ते खचले, भिंतींना तडे; कपीलधारवाडीचे ‘माळीण’ तर होणार नाही ना? गावात भीती
By सोमनाथ खताळ | Updated: October 2, 2025 12:13 IST2025-10-02T12:13:16+5:302025-10-02T12:13:57+5:30
बालाघाटच्या कुशीत असलेल्या कपिलधारवाडी गावात सध्या माळीण (जि.पुणे) दुर्घटनेसारखे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर खचायला सुरुवात झाली असून, अनेक घरांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत.

रस्ते खचले, भिंतींना तडे; कपीलधारवाडीचे ‘माळीण’ तर होणार नाही ना? गावात भीती
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बालाघाटच्या कुशीत असलेल्या कपिलधारवाडी गावात सध्या माळीण (जि.पुणे) दुर्घटनेसारखे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर खचायला सुरुवात झाली असून, अनेक घरांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. गावात येणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे, वाडीतील जवळपास ५०० लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. ‘साहेब, आमचा जीव तर जाणार नाही ना?’ अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पुनर्वसनासाठी अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याचा पाठपुरावाही केला. बांधकाम विभागाला विचारल्यावर ते मंत्रालयात प्रलंबित असल्याचे सांगतात. आमची तेथे ओळख नाही.
संदीप नवले, सरपंच
मध्यरात्री १२:३० वाजताच लोक मंदिरात
घराला तडे गेल्याचा प्रकार लक्षात येताच मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजता कपिलधारवाडीच्या लोकांनी कपिलधार येथील मंदिरात आश्रय घेतला. प्रशासनानेही तेथे धाव घेत तात्पुरती मदत केली. लोकांना रात्र मंदिरात काढावी लागली.