निवृत्त अधिकाऱ्याची ४५ लाखांची फसवणूक; शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 21:17 IST2025-10-14T21:16:35+5:302025-10-14T21:17:51+5:30
Ambernath Retired GST Officer Fraud: अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली.

निवृत्त अधिकाऱ्याची ४५ लाखांची फसवणूक; शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली. याप्रकरणी सोमवारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रामकृष्ण पाटील हे निवृत्त जीएसटी अधिकारी असून त्यांनी आपल्या निवृत्तीनंतरची मिळालेली रक्कम चांगल्या परताव्याच्या अनुषंगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर त्यांनी दोन ट्रेडिंग कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक केले.
ज्या ट्रेडिंग कंपनीच्या नावावर ही गुंतवणूक करण्यात आली होती ती शेअर मार्केटमधील बड्या कंपनीच्या नावाशी समानता राखणारी असल्यामुळे त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे कळाले नाही. जी ऐट आयसीआयसीआय ग्रुप आणि एल एट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट नावाच्या या दोन बोगस कंपन्यांमध्ये त्यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल ४५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या एका अकाउंटमध्ये तब्बल एक कोटी तर दुसऱ्या अकाउंट मध्ये सव्वा कोटीच्या वर रक्कम जमा झाल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले होते.
या जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र दोन्ही बोगस कंपन्यांनी पैसे काढण्यासाठी पुन्हा नव्याने पैसे भरावे लागतील असा सल्ला दिला. कंपन्यांची टाळाटाळ पाहता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल केला.