Vidhan Parishad Election Result Today विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांचा आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 11:24 IST2024-07-01T05:39:57+5:302024-07-01T11:24:00+5:30
नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळपासून मतमोजीणीला सुरुवात होणार आहे.

Vidhan Parishad Election Result Today विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांचा आज निकाल
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होईल. मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर रिंगणात आहेत.
मतमोजणीसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. शनिवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिराला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उपस्थित होते. नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याने याच ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रायगडचे किशन जावळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते.