" सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी व शरद पवार यांची..!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 15:01 IST2020-12-12T14:45:37+5:302020-12-12T15:01:33+5:30
शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक

" सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी व शरद पवार यांची..!"
पुणे : शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करतो. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्था ही छत्रपती शाहू महाराजांचे जीवंत स्मारक असुन, ते वाचवण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारची आहे. ते पुढे म्हणाले, एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगत असून कलम 25 नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत, सरकार निर्णय घेईल असे सांगत आहे. यावरून अद्याप ही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी दिला.
एकीकडे शासन सारथी संस्थेला स्वायत्तता असलेले सांगत असले तरी दुसर्या बाजूला सारथी संस्था तारादूतांचा प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार नसल्याचे सांगून विषय टाळत आहे व छत्रपती संभाजीराजे सारथी संस्थेला भेट देण्याचे माहिती असुन देखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित नसणे ही संस्थेची बाब चुकीची आहे. असे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले.