"औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून शिवसेनेने राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी..!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:30 IST2021-01-04T13:30:23+5:302021-01-04T13:30:44+5:30
औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे.

"औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून शिवसेनेने राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी..!"
पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी देखील आपल्या केलेल्या दाव्यांमध्ये सुद्धा मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. यात भाजप व मनसेकडून याच मुद्याचा संदर्भ घेत शिवसेना व काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत औरंगाबाद शहराच्या नामांतर विषयावर भाष्य केले. पाटील म्हणाले,
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पुणे पालिकेत याबाबतचा ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल.
भाजप- मनसे युतीवर केले ' हे'महत्वपूर्ण भाष्य..
मनसे सोबतच्या युतीबाबत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची चर्चा करण्यात आलेली नाही असे महत्वपूर्ण भाष्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.